लंडन : लवकरच तुमच्या घरातील आणि वैयक्तिक वापराची अनेक उपकरणे बॅटरीशिवाय काम करू शकतील. एका क्रांतिकारी नवीन सौर तंत्रज्ञानामुळे हे शक्य होणार आहे. संशोधकांनी असे नवीन सौर घट (solar cells) विकसित केले आहेत, जे केवळ घरातील सामान्य प्रकाशातून ऊर्जा मिळवू शकतात. या शोधामुळे कीबोर्ड, अलार्म आणि सेन्सरसारखी उपकरणे घरातील मंद प्रकाशावर चालवणे शक्य होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर मटेरियल्स डिस्कव्हरी’चे सहयोगी प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सहलेखक मोजतबा अब्दी जलेबी यांच्या मते, पेरोव्स्काईटपासून बनवलेले सौर घट भविष्यात बॅटरीसाठी एक अधिक टिकाऊ आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतात. ‘आज अब्जावधी उपकरणे कमी ऊर्जेवर चालतात आणि त्यासाठी सतत बॅटरी बदलावी लागते, जी एक अशाश्वत पद्धत आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या विस्तारामुळे ही संख्या आणखी वाढेल,’ असे जलेबी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
‘सध्या घरातील प्रकाशातून ऊर्जा मिळवणारे सौर घट महागडे आणि अकार्यक्षम आहेत. आमचे खास तयार केलेले पेरोव्स्काईट सौर घट व्यावसायिक घटांपेक्षा खूप जास्त ऊर्जा मिळवू शकतात आणि इतर प्रोटोटाईपपेक्षा अधिक टिकाऊ आहेत. यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या प्रकाशावर चालणार्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा मार्ग मोकळा झाला आहे.’ थोडक्यात, या शोधामुळे भविष्यात छोट्या उपकरणांसाठी बॅटरीची गरज संपुष्टात येऊ शकते आणि अधिक पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढू शकतो.
‘अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स’ या जर्नलमध्ये 30 एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी ‘पेरोव्स्काईट’ (perovskite) नावाच्या विशिष्ट सामग्रीचा वापर करून प्रकाश गोळा करणारे सौर घट तयार केले आहेत. हे मटेरियल पारंपरिक सिलिकॉनआधारित सौर पॅनेलपेक्षा वेगळे आणि अधिक फायदेशीर आहे. अभ्यासानुसार, पेरोव्स्काईट कमी तीव्रतेचा आणि घरातील मंद प्रकाश अधिक कार्यक्षमतेने शोषून घेते, ज्यामुळे ते घरातील वापरासाठी अत्यंत आदर्श ठरते. संशोधकांना असे आढळले की, त्यांनी विकसित केलेले नवीन पेरोव्स्काईट सौर घट हे सिलिकॉनआधारित सौर घटांपेक्षा तब्बल सहापटीने अधिक कार्यक्षम आहेत.