न्यूयॉर्क : जगातील अनेकजण फिटनेसला प्रेरणा देतात; पण केविन कुलमचा प्रवास या सर्वांपेक्षा वेगळा आहे. अमेरिकेतील या फिटनेस फ्रीकने आपल्या आयुष्यात एक असा विक्रम केला आहे, जो ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. केविनने वर्षभरात दहा लाख पुश-अप्स पूर्ण केले आणि मानसिक आरोग्य जागरूकता मोहिमेचा एक भाग बनविला.
केविन कुलम म्हणतो की, त्याचे ध्येय केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नव्हते. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्याने हे चॅलेंज स्वीकारले. केविनचा असा विश्वास आहे की, शारीरिक तंदुरुस्तीचा मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. त्यांनी आपल्या प्रवासात अनेकांना प्रेरणा दिली आणि नियमित व्यायामामुळे तणाव, नैराश्य आणि चिंता यांच्याशी लढण्यास कशी मदत होते हे सांगितले. केविनने आपले ध्येय गाठण्यासाठी दररोज सरासरी 2,740 पुश-अप्स केले. शारीरिकच नव्हे तर मानसिकद़ृष्ट्याही हे मोठं आव्हान होतं. हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. थकवा आणि शारीरिक वेदनांनी त्याला कधी कधी थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याची चिकाटी आणि निर्धार त्याला पुढे जाण्याचे बळ देत होता. आपल्या मोहिमेदरम्यान केविनने सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की, तुमचे शरीर म्हणजे तुमच्या मनाची सावली आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली तर तुमचं मनही निरोगी राहील. केविन कुलमचे ध्येय केवळ पुश-अप्स रेकॉर्ड करणे नव्हते, तर फिटनेस आणि मानसिक आरोग्य हातात हात घालून चालते, हा संदेश देणे हे होते. स्वत:ला मानसिक आणि शारीरिकद़ृष्ट्या मजबूत बनवू इच्छिणार्यांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.