विश्वसंचार

Kenya young woman: केनियाच्या तरुणीचे झाडाला 72 तास आलिंगन

‘सर्वात लांब मॅरेथॉन ट्री-हगिंग‌’चा विश्वविक्रम

पुढारी वृत्तसेवा

नैरोबी : केनियाची 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ट्रूफेन मुथोनी हिने सलग तब्बल 72 तास झाडाला आलिंगन देण्याबाबत ‌‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌‍‌’ मध्ये आपले नाव नोंदवले आहे. ‌‘सर्वात लांब मॅरेथॉन ट्री-हगिंग‌’ श्रेणीत तिने हा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌‍ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रूफेनने हे यश 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2025 दरम्यान मिळवले. न्येरी येथील गव्हर्नर कार्यालय परिसरात 11 डिसेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता तिने 72 तासांचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर एका उदात्त हेतूने ट्रूफेनने हे आव्हान स्वीकारले होते : स्थानिक वृक्षांचे संरक्षण : स्थानिक झाडांच्या रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे. आदिवासी ज्ञानाचा सन्मान : हवामान संकटाशी लढण्यासाठी आदिवासी समुदायांकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणे. निसर्गाशी नाते : पर्यावरण संरक्षण ही केवळ जबाबदारी नसून ती एक आवड (पॅशन) बनावी, यासाठी लोकांना निसर्गाशी जोडणे. ट्रूफेनने ट्री-हगिंग मॅरेथॉनमध्ये जागतिक ओळख मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 31 जानेवारी ते 2 फेबुवारी 2025 दरम्यान तिने नैरोबीमध्ये 48 तास झाडाला मिठी मारून रेकॉर्ड केला होता. आता 72 तासांचा विक्रम करत तिने स्वतःचाच जुना रेकॉर्ड 24 तासांच्या फरकाने मोडीत काढला आहे.

यापूर्वी हा विक्रम घानाचा अब्दुल हकीम अवाल याच्या नावावर होता, ज्याने मे 2024 मध्ये 24 तास 21 मिनिटे झाडाला मिठी मारली होती. 72 तास सलग उभे राहून झाडाला मिठी मारणे सोपे नव्हते. यासाठी ट्रूफेनने पाच महिने सराव केला होता. यामध्ये 42 किलोमीटरच्या पदयात्रा आणि सलग 12 तास झाडाला बिलगून राहण्याच्या सरावाचा समावेश होता. निसर्गाशी सान्निध्यात राहण्याचे मानसिक आणि भावनिक फायदे जगाला दाखवून देणे हा तिचा प्रयत्न होता. विक्रमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर ट्रूफेनने फेसबुकवर ‌‘लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी‌’ अशी भावना व्यक्त केली. सोशल मीडियावर तिच्या या धाडसी पावलाचे पर्यावरण प्रेमींकडून मोठे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT