न्यूयॉर्क : जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, गेल्या दीड वर्षापासून जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये भीती, चिंता आणि तणाव वाढला आहे. यामुळे हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाचेही प्रमाण वाढले. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार 2015 मध्ये सुमारे 113 कोटी लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. तर 2025 मध्ये जगातील सुमारे 29 टक्के लोकसंख्या उच्च रक्तदाबाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.
उच्च रक्तदाब हा हदयासंबंधीचे आजार, स्ट्रोक, हार्टअॅटॅक, हार्ट फेल्यूअर यासारख्या आजारांना जबाबदार ठरतो. यामुळे उच्च रक्तदाबाला डॉक्टर सायलेंट किलर असे म्हणतात. दैनंदिन जीवनशैली व खाण्या-पिण्यात बदल करून उच्च रक्तदाबाच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण आणता येऊ शकते. दरम्यान, धूम्रपान केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांपर्यंत रक्तदाब वाढलेला असतो. याशिवाय निकोटिनमुळे आर्टरिज आकुंचित होतात, तसेच कडा कडक होतात. याशिवाय रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यताही बळावते. यामुळेच रक्तदाब असलेल्या लोकांनी धूम्रपानापासून दूर राहणे लाभदायी ठरते, असे संशोधकांचे मते आहे.
दरम्यान, मिठाचे सेवनही उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरते. यासाठी दिवसाला केवळ 5 ग्रॅम मीठ खावयास हवे. एक लहान चमचा मिठामध्ये 2300 मिग्रा सोडियम असते. खाण्यातील मिठाचे प्रमाण कमी करून उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार नियमितपणे रोज किमान 30 मिनिटे चालल्यानेही उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.