रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे ‘काढे’ Pudhari File Photo
विश्वसंचार

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे ‘काढे’

दररोज ते पिण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या!

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात अनेकांना संसर्ग, सर्दी-खोकला असा त्रास होतो. त्यापासून तसेच कोव्हिडपासून बचाव करण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही काढा पिऊ शकता, असे तज्ज्ञ सांगतात. काढ्यामध्ये असलेल्या तुळस, आलं, हळद आणि गुळवेल यांसारख्या औषधी वनस्पतींमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बहुतेक घटकांचे स्वरूप उष्ण असते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात घेणे चांगले. याशिवाय, दररोज ते पिण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या! अशा विविध काढ्यांची व त्यांच्या फायद्यांची ही माहिती...

गुळवेल काढा :

गुळवेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यापासून काढा देखील बनवता येतो. गुळवेलपासून बनवलेला काढा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतो. हा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 2 कप पाणी घ्या आणि ते मंद आचेवर ठेवा. यानंतर, गुळवेल आणि आले, हळद आणि तुळशीची काही पाने यांसारखे इतर घटक पाण्यात टाकून मंद आचेवर हे पाणी उकळवा. हे पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर ते एका कपमध्ये गाळून प्या.

तुळशीची पाने आणि हळद :

तुळशीची पाने आणि हळद यापासून काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि ते मंद आचेवर ठेवा. त्यानंतर त्या पाण्यात आले, काळी मिरी, हळद आणि तुळशीची पाने टाकून 15 ते 20 मिनिटे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा आणि गाळून घ्या. तुमच्या आवडीनुसार गूळ टाकून हा काढा हळूहळू प्या.

ज्येष्ठमध आणि आल्याचा काढा :

आले आणि ज्येष्ठमधाचा काढादेखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण, ज्येष्ठमधातील गुणधर्म तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे करण्यासाठी, एका भांड्यात आवश्यकतेनुसार पाणी घ्या आणि मंद आचेवर ठेवा. आता या पाण्यात तुळशीची पाने आणि आद्रक टाका. यानंतर ज्येष्ठमधाची पावडर आणि हळद टाकून पाणी निम्मे होईपर्यंत उकळवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 ग्लास पाणी ठेवले असेल, तर 1 ग्लास इतकं पाणी कमी झाल्यानंतर गॅस बंद करा. आता ते थोडे थंड होऊ द्या.

दालचिनी आणि लवंगाचा काढा :

दालचिनी आणि लवंगाचा काढादेखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करू शकतो. अशा परिस्थितीत या दोन्हींचा काढा बनवून ते सेवन केले जाऊ शकते. हा काढा बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 3 लवंगा आणि 1 इंच दालचिनी तुकडा टाकून पाणी उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. आता तयार काढा गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या.

हळदीचा काढा :

सर्दी, सूज आणि वेदना यांसारख्या समस्यांमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचा काढा फायदेशीर मानला जातो. हा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात हळदीचा तुकडा किंवा हळद पावडर टाकून मिक्स करा. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. हळदीचा काढा थोडा कोमट असताना प्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT