काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल सध्या शतकातील सर्वात भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. ‘प्रॉस्पर ग्लोबल’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत पूर्णपणे पाणी संपवणारे काबुल हे जगातील पहिले आधुनिक शहर ठरण्याची भीती आहे. हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि भूजल पातळीतील प्रचंड घट यामुळे शहरात ‘डे झिरो’ची स्थिती ओढवली आहे.
शहरातील बहुतांश भागात नळाचे पाणी बंद झाले आहे. खैर खाना भागातील रहिवासी शाझिया यांच्यासारख्या हजारो गृहिणींना पाण्यासाठी स्थानिक मशिदीतील हातपंपावर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. लहान मुलांना शाळेतून आणून पाण्याच्या बादल्या वाहण्यास भाग पाडावे लागत असून, गरिबांना पाण्याचे टँकर विकत घेणे परवडत नाही.
गेल्या दशकात काबुलची भूजल पातळी सुमारे
१०० फुटांनी घसरली आहे. तैमानी भागातील रहिवासी मिर्झा जान यांच्या मते, १९९० मध्ये वर असलेले पाणी आता ७०० फुटांवर बोअरवेल खोदल्यावरही मिळेनासे झाले आहे. शहरातील निम्मे कूपनलिका कोरडे पडले असून, उपलब्ध पाण्यापैकी ८० टक्के पाणी सांडपाणी व अर्सेनिकमुळे दूषित झाले आहे.
लोकसंख्या विस्फोट आणि आर्थिक भार
२००१ मध्ये १० लाख असलेली काबुलची लोकसंख्या आज ६० लाखांवर पोहोचली आहे. ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर आणि बहुमजली इमारतींमुळे जलस्रोतांवर प्रचंड ताण आला आहे. असदुल्लाह अहमदी यांच्यासारखे नागरिक रोज १५० अफगाणी केवळ पाण्याच्या टँकरवर खर्च करत आहेत. गरीब कुटुंबे आपल्या उत्पन्नाचा तब्बल ३०% भाग फक्त पिण्याच्या पाण्यावर खर्च करत आहेत.