Ganymede Moon | गुरूचा महाकाय चंद्र ‘गॅनिमीड’ आतून तापतोय 
विश्वसंचार

Ganymede Moon | गुरूचा महाकाय चंद्र ‘गॅनिमीड’ आतून तापतोय

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : गुरू ग्रहाचा महाकाय चंद्र ‘गॅनिमीड’ हा स्वतःचे चुंबकीय क्षेत्र असलेला आपल्या सूर्यमालेतील एकमेव ज्ञात चंद्र आहे. आता हा चंद्र एका अशा अनोख्या प्रक्रियेतून आतून तापत आहे, जी ‘ब्रह्मांडात इतर कुठेही पाहिली गेलेली नाही,’ असा खळबळजनक दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे.

6 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले असून, शास्त्रज्ञांनी गॅनिमीडच्या गाभ्याबद्दल (कोअर) एक नवा सिद्धांत मांडला आहे. गुरू ग्रहाभोवती फिरणार्‍या चार प्रमुख ‘गॅलिलियन’ उपग्रहांपैकी गॅनिमीड हा एक असून, तो सूर्यमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे. याचा व्यास सुमारे 5,300 किलोमीटर (3,300 मैल) आहे. हा चंद्र पृथ्वीच्या चंद्रापेक्षा 1,600 किलोमीटरने मोठा असून आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह ‘बुध’ पेक्षाही आकाराने किंचित मोठा आहे. (दरम्यान, गुरू ग्रहाला एकूण 100 हून अधिक प्रमाणित चंद्र आहेत, ज्यातील सर्वात मोठ्या चार चंद्रांना ‘गॅलिलियन मून्स’ म्हटले जाते).

1996 मध्ये नासाच्या ‘गॅलिलिओ’ अंतराळ यानाने गॅनिमीडच्या या चुंबकीय क्षेत्राचा शोध लावला होता. हा चुंबकीय प्रभाव चंद्राच्या गाभ्यातील वितळलेल्या आणि फिरत्या लोखंडामुळे (Dynamo Process) तयार होतो. परंतु, हा गाभा नेमका कधी आणि कसा तयार झाला, यावर शास्त्रज्ञांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. कॅलटेकचे ग्रह शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक केविन ट्रिन यांनी सांगितले की ‘अनेक अभ्यासांनुसार, गॅनिमीडची निर्मिती इतकी थंड वातावरणात झाली होती की सुरुवातीला तिथे धातूचा गाभा तयार होणे अशक्य होते. तर दुसरीकडे, काही सिद्धांतांनुसार पृथ्वीप्रमाणेच गॅनिमीडचा गाभा देखील त्याच्या निर्मितीच्या वेळीच तयार झाला असावा, असे मानले जाते. हे दोन्ही दावे एकाच वेळी खरे असू शकत नाहीत.

‘यावर तोडगा काढत संशोधकांनी एक नवीन ‘उलटा’ (Topsy- turvy) सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार, गॅनिमीडचा धातूचा गाभा आणि चुंबकीय क्षेत्र सुरुवातीला तयार न होता, खूप नंतरच्या काळात तयार झाले असावे. चंद्राच्या निर्मितीनंतर खूप उशिरा लोखंडाचे वितळलेले गोळे या महाकाय चंद्राच्या केंद्रात जाऊन जमा झाले आणि ही प्रक्रिया आजही सुरू असण्याची शक्यता आहे. पारंपरिक सिद्धांतानुसार, पृथ्वीसारख्या मोठ्या खगोलीय वस्तूंचा गाभा सुरुवातीला खूप गरम असतो आणि नंतर तो हळूहळू थंड होत जातो. मात्र, गॅनिमीडच्या बाबतीत ही प्रक्रिया नेमकी उलट असून तो ‘उष्णतेमुळे चालणार्‍या डायनामो’ (Warming- driven dynamo) प्रक्रियेतून जात आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांचे कुतूहल कमालीचे वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT