Jupiter planet | गुरू ग्रह आपण समजतो त्यापेक्षा आकाराने लहान आणि चपटा! 
विश्वसंचार

Jupiter planet | गुरू ग्रह आपण समजतो त्यापेक्षा आकाराने लहान आणि चपटा!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला ‘गुरू’ प्रत्यक्षात आपण गेल्या अनेक दशकांपासून मानत आलो आहोत त्यापेक्षा थोडा लहान आणि अधिक चपटा असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. ‘नासा’च्या ‘जुनो’ या अंतराळयानाकडून मिळालेल्या रेडिओ डेटाचा वापर करून शास्त्रज्ञांनी या ग्रहाच्या आकाराची अधिक अचूक मोजमापे निश्चित केली आहेत.

‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात 2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गुरू ग्रहाच्या सध्याच्या आणि जुन्या मोजमापांमधील फरक जरी कमी असला, तरी यामुळे गुरू आणि त्याच्यासारख्या इतर वायू महाकाय ग्रहांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करणे अधिक सोपे होणार आहे. इस्रायलमधील ‘वेइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक योहाई कास्पी यांनी सांगितले की, ‘आता पाठ्यपुस्तके अपडेट करण्याची गरज आहे.

गुरू ग्रहाचा आकार बदललेला नाही, पण तो मोजण्याची आमची पद्धत बदलली आहे.’ आतापर्यंत गुरू ग्रहाचा आकार आणि आकारमान हे 50 वर्षांपूर्वीच्या ‘व्हॉयेजर 1 आणि 2’ तसेच ‘पायोनियर 10 आणि 11’ या मोहिमांनी घेतलेल्या सहा मोजमापांवर आधारित होते. मात्र, 2016 पासून गुरू ग्रहाचा अभ्यास करणार्‍या ‘जुनो’ मोहिमेने गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात रेडिओ डेटा गोळा केला आहे. या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी गुरूच्या आकाराचा अचूक अंदाज प्रत्येक दिशेला सुमारे 1300 फूट (400 मीटर) पर्यंत कमी केला आहे. जुनोकडून पृथ्वीवर येणारे रेडिओ सिग्नल गुरूच्या वातावरणातून जाताना कसे वाकतात, याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला.

याद्वारे ग्रहावरील वार्‍यांचा वेग आणि त्यांच्यामुळे आकारात होणारा बदल लक्षात घेऊन नवीन आकडेवारी समोर आली आहे. ध्रुवीय त्रिज्या : नवीन मोजमापानुसार ही 66,842 किमी आहे, जी जुन्या अंदाजापेक्षा 12 किमीने कमी आहे. विषुववृत्तीय त्रिज्या : नवीन मोजमाप 71,488 किमी आहे, जे पूर्वीपेक्षा 4 किमीने कमी आहे. ‘हे काही किलोमीटरचे अंतर खूप महत्त्वाचे आहे. त्रिज्येतील या छोट्या बदलामुळे गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण आणि वातावरणीय मोजमापांचे मॉडेल अधिक अचूकपणे मांडता येणे शक्य झाले आहे,’ असे तज्ज्ञ एली गलांती यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT