लंडन: प्रसिद्ध पटकथा लेखक आणि माहितीपट निर्माती जेमिमा गोल्डस्मिथ ५२ व्या वर्षी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. आयरीश-ऑस्ट्रेलियन कोट्यधीश फायनान्सर कॅमेरून ओ'रेली (Cameron O'Reilly) यांच्याशी तिचा साखरपुडा झाला असून, गेल्या १२ महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते.
६२ वर्षीय कॅमेरून ओ'रेली हे दिवंगत मीडिया टायकून सर अँथनी ओ'रेली यांचे पुत्र आहेत. जेमिमा आणि कॅमेरून यांची भेट कामाच्या निमित्ताने झाली. कॅमेरून यांनी अनेक माहितीपटांमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे. कॅमेरून ओ'रेली हे 'स्मार्ट मीटर' आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यांनी २०११ मध्ये आपली स्विस कंपनी तोशिबा ला २.३ अब्ज डॉलर्सना विकली होती. जेमिमा हिचे जवळचे मित्र सांगतात की हे जोडपे सध्या अत्यंत आनंदी आहे. ओ'रेली हे अत्यंत खासगी व्यक्ती असून जेमिमा त्यांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेत आहे.
जेमिमाने २१ व्या वर्षी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि दिग्गज क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी लग्न केले होते. नऊ वर्षांच्या संसारानंतर २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना कासिम आणि सुलेमान ही दोन मुले आहेत. इम्रान खान यांच्यानंतर जेमिमा यांचे नाव अभिनेता ह्यु ग्रांट आणि कॉमेडियन रसेल ब्रँड यांच्याशीही जोडले गेले होते. जेमिमा सध्या पाकिस्तानात तुरुंगात असलेल्या आपल्या माजी पतीच्या (इम्रान खान) सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम चालवत आहे. जेमिमाने पटकथा लेखक म्हणून मोठी ओळख निर्माण केली आहे. तिने 'द क्लिंटन अफेअर' सारख्या गाजलेल्या माहितीपटांची निर्मिती केली आहे.