न्यूयॉर्क : कधी कधी मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात भलत्याच गोष्टी अडकत असतात. आताही अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. तिथे एका मासेमारी करणार्या माणसाच्या जाळ्यात तब्बल 32 वर्षे जुनी जीप अडकली. ही जीप चोरीला गेलेली होती हे नंतर निष्पन्न झाले.
अमेरिकेच्या कन्सास येथे राहणारा एक व्यक्ती चेनी झील येथे मासेमारीसाठी गेला होता. त्याच्या हाताला खूप मोठा मासा लागलाही; परंतु त्याच्यासोबतच त्याच्या जाळ्यात एक मोठी वस्तूही आली. त्याला पाण्याच्या खाली असलेली एक जीप सापडली. जॉन माऊन्स यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मी आजूबाजूला मासे शोधत होतो. तेव्हाच मला कळाले की पाण्यातून काहीतरी मोठी गोष्टी वर येताना दिसते आहे.
तेवढ्यात मी माझं सगळं काही बाजूला ठेवलं आणि ती गोष्ट काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न सुरू केला. याची चाचपणी केल्यानंतर समजले की ही जीप 1990 च्या काळातील आहे. आपल्याला ही जीप मिळाल्याचा त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या हा फोटो सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असेही समजते की ही गाडी चोरीला गेली होती.