Japan Queue Service | जपानमध्ये रांगेत उभे राहण्यासाठीही मिळतात ‘भाड्याने’ माणसे 
विश्वसंचार

Japan Queue Service | जपानमध्ये रांगेत उभे राहण्यासाठीही मिळतात ‘भाड्याने’ माणसे

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : जपान हा देश शिस्त, स्वच्छता आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधासाठी जगभरात ओळखला जातो. यासोबतच, जपानमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड सुद्धा भाड्याने मिळतात, असा दावा करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे ऐकल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, ‘खरंच असं असतं का?’ याबाबत जपानची प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर मायो हिने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये जपानमधील जीवनशैली, तिथले नातेसंबंध, नोकरी-व्यवसाय, लग्न आणि समाजाशी जोडलेल्या अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला आहे. जपानमध्ये चक्क रांगेत उभे राहण्यासाठीही भाड्याने माणसं मिळतात, असे तिने सांगितले.

जपानमधील 'रेंटल सर्व्हिस' (भाड्याने सेवा मिळणे) बद्दल बोलताना मायोने सांगितले की, लोकांना सहसा फक्त गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड भाड्याने मिळण्याबद्दल माहिती असते; पण तिथली सेवा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. जर एखाद्याला आपली नोकरी सोडायची असेल; पण स्वतःच्या बॉसशी थेट बोलण्याची हिंमत होत नसेल, तर त्याच्या वतीने बॉसशी बोलून नोकरीचा राजीनामा देण्यासाठीही तिथे एजन्सी किंवा लोक भाड्याने मिळतात. याशिवाय, एखाद्या प्रसिद्ध दुकानाबाहेर किंवा हॉटेलबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहण्यासाठीही लोक भाड्याने मिळतात. तो माणूस तुमच्या जागी रांगेत उभा राहतो आणि तुमचा नंबर आल्यावर तुम्ही थेट जाऊन तिथल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता.

मायोच्या मते, जपानमध्ये आता बहुतांश लोक एकटे राहतात. कुटुंबासोबत राहण्याची पद्धत तिथे वेगाने कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकांना प्रचंड एकटेपणा जाणवतो. हाच एकटेपणा दूर करण्यासाठी तिथे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. या सेवांकडे केवळ मनोरंजनाचा एक भाग म्हणून पाहिले जाते. अनेक लोक फक्त कोणाची तरी साथ मिळावी किंवा मनमोकळेपणाने बोलता यावे, म्हणूनच या सेवांचा आधार घेतात.

या पॉडकास्ट दरम्यान मायोने भारत आणि जपानच्या दूतावासात (एम्बेसी) भारताच्या सात वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळांची चव घेतली. भारतीय तांदळाची चव, त्याचा आकार आणि सुगंध पूर्णपणे वेगळा आणि उत्तम असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, भारताच्या जम्मू-काश्मीरमधील ‘मुश्क बुदजी’ हा तांदूळ शिजल्यानंतर थोडा चिकट होतो. जपानमधील लोकांना चिकट भात खाण्याची सवय असल्याने, काश्मीरचा हा तांदूळ जपानी लोकांना प्रचंड आवडतो, अशी रंजक माहितीही तिने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT