112 Gbps Internet Speed | जपानी शास्त्रज्ञांनी नोंदवला 112 गिगाबिटस् इंटरनेटचा विक्रमी वेग! 
विश्वसंचार

112 Gbps Internet Speed | जपानी शास्त्रज्ञांनी नोंदवला 112 गिगाबिटस् इंटरनेटचा विक्रमी वेग!

‘6जी’च्या दिशेने मोठे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : पुढील पिढीच्या ‘6जी’ वायरलेस नेटवर्कच्या उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या एका विशिष्ट स्पेक्ट्रम बँडवर प्रति सेकंद 112 गिगाबिटस् (112 Gbps) या वेगाने डेटा ट्रान्समिट (प्रसारित) करण्याचा एक नवा मार्ग जपानमधील शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. या क्रांतिकारी यशामुळे भविष्यात अतिवेगवान इंटरनेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा अभूतपूर्व टप्पा गाठण्यासाठी संशोधकांनी ‘मायक्रोकोम्ब्स’ द्वारे चालणारी एक नवीन प्रकारची टेराहर्टझ् वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली विकसित केली आहे. मायक्रोकोम्ब्स ही मायक्रोचिपवर बसवलेली विशेष फोटोनिक उपकरणे असतात, जी वायरलेस नेटवर्कसाठी ऑप्टिकल फ्रिक्वेन्सी (प्रकाश फ्रिक्वेन्सी) तयार करतात. जेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर ‘हाय-ऑर्डर मॉड्यूलेशन’ तंत्रासोबत (मर्यादित बँडविड्थमध्ये जास्त डेटा ट्रान्सफर करण्याची प्रगत पद्धत) करण्यात आला, तेव्हा संशोधकांच्या पथकाला 560 गिगाहर्टझ् (560 GHz) स्पेक्ट्रम बँडवर हा अत्यंत वेगवान वायरलेस कम्युनेशन स्पीड मिळवण्यात यश आले. 420 GHz पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीवर पहिल्यांदाच असा वेग मिळवणे शक्य झाले आहे.

या प्रयोगाने हे सिद्ध केले आहे की, ही नवीन प्रणाली सिग्नलची ताकद कमी होणे आणि ‘आवाज’ (Noise) यासारख्या पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्सच्या मर्यादांवर सहज मात करू शकते. यापूर्वी अति-उच्च फ्रिक्वेन्सीवर पारंपरिक उपकरणांचा डेटा स्पीड खूपच मंदावत असे. संशोधकांनी आपले हे निष्कर्ष 16 मे रोजी ‘कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग’ या नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत. या संशोधनाचे सह-लेखक आणि तोकुशिमा युनिव्हर्सिटीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-एलईडी फोटोनिक्स’चे प्राध्यापक ताकेशी यासुई यांनी एका निवेदनात सांगितले की, ‘हा निकाल व्यावहारिक 6जी वायरलेस प्रणाली आणि अल्ट्रा-हाय-स्पीड मोबाईल बॅकहॉलच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे पाऊल आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT