विश्वसंचार

ढगांपर्यंतही पोहोचले मायक्रोप्लास्टिक

Arun Patil

टोकियो : पावसाचे थेंब प्रत्येकाला ताजेतवाने करतात. काही जणांना पावसात भिजणे आवडते, त्याचा आनंद लुटणे आवडते. पण पावसाच्या पाण्यातून प्लास्टिकची बरसातही होऊ लागली तर काय होईल? प्रत्यक्षात ही निव्वळ कल्पना वाटेल. मात्र, जपानच्या शास्त्रज्ञांनी ढगात तरंगते पॉलिमर व रबर शोधून काढले असून ही बाब जलवायूच्या द़ृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. कारण, प्लास्टिक जर एकत्र झाले तर पृथ्वीतलावरील वायुमंडळ धोक्यात येऊ शकते.

जपानच्या शास्त्रज्ञांना प्रथमच ढगात प्लास्टिकचे नमुने आढळले असून ते समुद्राच्या माध्यमातून तिथवर पोहोचल्याचा अंदाज आहे. दरवर्षी प्लास्टिकचे एक कोटी तुकडे नद्यांमधून समुद्रापर्यंत पोहोचतात आणि तेथून ते वायुमंडळाच्या दिशेने आपला मार्ग शोधतात.

जपानमधील या पथकाने माऊंट फुजी व माऊंट ओयामाच्या 1300 ते 3776 मीटर उंचीवरील शिखरावरून पाणी एकत्रित केले आणि त्यावर संशोधन केले. या सर्व पाण्याच्या नमुन्यांचे कॉम्प्युटर इमेजिंग तंत्राच्या मदतीने विश्लेषण केले गेले. शास्त्रज्ञांना यात असे आढळून आले की, ढगातून एकत्रित केल्या गेलेल्या प्रत्येक लिटर पाण्यात प्लास्टिकचे 6.7 ते 13.9 तुकडे होते. त्याची उंची 7.1 मायक्रोमीटर ते 94.6 मायक्रोमीटरपर्यंत होती. त्याचा व्यास माणसाच्या एका केसाच्या आकाराइतका असतो.

एन्व्हायर्न्मेंटल केमिस्ट्री लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार पाण्याच्या या थेंबांमध्ये हायड्रोफिलिक पॉलिमरची सर्वाधिक मात्रा आढळून आली. हायड्रोफिलिक पॉलिमरची अधिक मात्रा पाण्यात किंवा द्रव्य रूपात अवशोषित करून अधिक फुलते. ती पाण्याला पकडून राहणारी असते. मात्र, सूर्यापासून येणारी किरणे या विषारी पॉलिमरचे बंध तोडून टाकतात. यात कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजनसारख्या ग्रीन हाऊस गॅसचे प्रमाण वाढते. त्यामुळे ढगात त्याचे प्रमाण अधिक असणे धोकादायक मानले जाते.

वासेदा विद्यापीठातील मुख्य लेखक हिरोशी ओकोची यांनी प्लास्टिकचे कण आपल्या वायुमंडळातील प्रदूषणामुळे आल्याचे निरीक्षण नोंदवले. ही समस्या निकालात काढली नाही तर पावसाचे चक्र बिघडू शकते. भविष्यात यामुळे कोरडा दुष्काळही पडू शकतो. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, मायक्रोप्लास्टिक असे कण आहेत, जे 5 मिलिमीटरपेक्षा कमी आकाराचे आणि अतिशय धोकादायक असतात. हेच पाणी पिण्याच्या आणि स्वयंपाकातील पाण्यातून शरीरात जाऊ शकते आणि गर्भवती महिलेच्या अर्भकापर्यंतही पोहोचू शकतात. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते, असे निरीक्षण यात नोंदवले गेले आहे.

SCROLL FOR NEXT