जपानमधील लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. त्यामुळे ते निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगतात. जपान हा एक असा देश आहे की, जो उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, शांती आणि स्थिरतेसाठी ओळखला जातो. येथील लोक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून निरोगी आयुष्य जगतात. या लहान आणि प्रभावी आरोग्यदायी सवयी अंगीकारून, तुम्हीसुद्धा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकता. तर जाणून घ्या जपानी लोक का निरोगी राहतात…
जपानी लोक कायमच पौष्टिक आहार घेतात. त्यांच्या जेवणात प्रामुख्याने भात, मासे आणि हिरव्या भाज्या, भाजलेले व वाफवलेले पदार्थ असतात. असे पदार्थ पचायला सोपे असतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात. याव्यतिरिक्त, येथील लोक अधिक प्रमाणात स्थानिक, घरगुती, रसायनमुक्त आणि नैसर्गिक पदार्थांचे सेवन करतात.
जमिनीवर वज्रासनात बसून जेवणे ही जपानी लोकांची एक अनोखी प्रथा आहे. यामुळे त्यांची पचनक्रिया सुधारते आणि गॅस, आम्लपित्त व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टाळता येतात. तसेच, वज्रासनामुळे पाठीचा कणा सरळ राहतो.
तज्ज्ञ नेहमी रात्रीचं जेवण लवकर करण्याचा सल्ला देतात. ही एक चांगली सवय आहे. जपानमधील बहुतेक लोक या सवयीचं पालन करतात. ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण करतात, जी एक अतिशय आरोग्यदायी पद्धत आहे. यामुळे शरीराला रात्रीच्या वेळी विषमुक्त होण्यासाठी आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. ही सवय अंगीकारल्याने तुम्हाला निरोगी राहण्यासही मदत होईल.
जपानमध्ये ग्रीन टी मोठ्या प्रमाणावर प्यायली जाते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. ग्रीन टी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे आपल्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश केला पाहिजे.
जपानी लोक अन्न पचनासाठी चालतात आणि सायकल चालवतात. यामुळे त्यांना अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि आजार दूर राहतात. शिवाय, यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासही मदत होते.