टोकियो : कधी कधी माणसांच्या गराड्यात राहण्याची सवय असली की, लोकांना एकांताचीही भीती वाटू लागते. एकटेपणा क्वचितप्रसंगी हवाहवासा वाटला तरीही बर्याचदा हाच एकटेपणा खायला येतो आणि त्याचा मानसिक, शारीरिक परिणाम स्पष्टपणे दिसू लागतो. फक्त मनुष्य प्रजातीमध्येच हा गुण नसून, प्राणीमात्रांमध्येही हाच स्वभाव पाहायला मिळतो. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ हेच दाखवून देत आहे. तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल, पण जपानमधील एका मत्स्यालयात घडलेला हा प्रकार पाहून सार्या जगानं आश्चर्याची भावना व्यक्त केली आहे. कारण, इथं चक्क एका माणसाळलेल्या माशासाठी मत्स्यालयात अशी काही व्यवस्था करण्यात आली की, पाहणार्यांनाही त्याचं कौतुक वाटलं.
व्हायरल होणारी ही गोष्ट आहे जपानमधील कायक्योकान मत्स्यालयातील. जिथं एक सनफिश एकटा पडला होता. त्याला माणसांची ये- जा पाहण्याची सवय झाल्यामुळं मत्स्यालयाच्याच वतीनं काहीशी तशीच व्यवस्था करण्यात आली. हे मत्स्यालय नूतनीकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आल्यामुळं तिथं मासे पाहण्यासाठी येणार्यांची संख्या जवळपास कमी आणि नंतर बंदच झाली. हे सर्व सुरू असतानाच सुरुवातीला या माशाच्या पचनक्रियेवर याचा परिणाम होतोय असं तिथं काम करणार्यांना वाटू लागलं. एक वेळ अशीही आली, जिथं या माशानं खाणं सोडलं. यावरूनच हा मासा एकटा पडला असावा, असा तर्क या कर्मचार्यांनी लावला आणि इथंच एक शक्कल लढवण्यात आली. मासा एकटा पडल्यामुळं येथील कर्मचार्यांनी तिथं माणसांची प्रतिकृती असणारे काही मुखवटे आणि पुतळे उभे केले आणि आश्चर्य म्हणजे याचा परिणामही दिसू लागला. माशाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सोशल मीडियावर सध्या जपानमधील या घटनेची बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.