जपानचा इंटरनेट स्पीडमध्ये विश्वविक्रम सेकंदाला  Andriy Onufriyenko
विश्वसंचार

Japan internet speed : जपानचा इंटरनेट स्पीडमध्ये विश्वविक्रम सेकंदाला

1.25 लाख जीबी डेटा ट्रान्सफर!

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : जपानमधील संशोधकांनी इंटरनेटच्या वेगाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढत एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या संशोधकांनी प्रति सेकंद तब्बल 1,25,000 गिगाबाईट डेटा 1,802 किलोमीटर अंतरावर यशस्वीपणे पाठवून दाखवला आहे. हा वेग इतका प्रचंड आहे की, अमेरिकेतील सरासरी इंटरनेट वेगाच्या तुलनेत तो तब्बल 40 लाख पट अधिक आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, या वेगाने संपूर्ण ‘इंटरनेट अर्काईव्ह’सारखा प्रचंड डेटाबेस चार मिनिटांपेक्षा कमी वेळेत डाऊनलोड करणे शक्य आहे.

यापूर्वी 2024 मध्येच स्थापित झालेला 50,250 Gbps चा विक्रमही या नव्या कामगिरीमुळे मागे पडला आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हे यश मिळवले असून, याबद्दलची माहिती सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या 48 व्या ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आली. या अविश्वसनीय वेगामागे शास्त्रज्ञांनी विकसित केलेली एक नवीन प्रकारची ऑप्टिकल फायबर केबल आहे. या नवीन फायबर केबलमध्ये डेटा वहन करण्याची क्षमता तब्बल 19 पारंपरिक ऑप्टिकल फायबर केबल्सइतकी आहे.

19-कोर फायबर : या केबलमध्ये 19 स्वतंत्र फायबर कोर एकाचवेळी काम करतात. लांब अंतरावर डेटा पाठवताना सिग्नल कमकुवत होणे किंवा डेटा लॉस होणे या सामान्य समस्या आहेत. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे या सर्व 19 कोरच्या केंद्रांमधून प्रकाश एकाच पद्धतीने प्रवास करतो, ज्यामुळे प्रकाशातील चढ-उतार कमी होतो आणि डेटा लॉस लक्षणीयरीत्या घटतो. सध्याच्या पायाभूत सुविधांशी सुसंगत : सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या 19-कोर असलेल्या केबलचा व्यास केवळ 0.127 मिलिमीटर आहे, जो सध्या वापरात असलेल्या सिंगल-फायबर केबलइतकाच आहे. याचा अर्थ, हे नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे भविष्यात खर्चात मोठी बचत होऊ शकते. यापूर्वी मार्च 2023 मध्ये याच टीमने असाच वेग गाठला होता, पण तेव्हा अंतर खूपच कमी होते. लांब अंतरावर डेटा लॉस कमी करणे आणि सिग्नलला अधिक प्रभावीपणे कसे वाढवायचे (amplify) ही शास्त्रज्ञांपुढील सर्वात मोठी आव्हाने होती. या आव्हानांवर मात केल्यामुळे सिग्नलची ताकद वाढली आणि डेटा अधिक अंतरावर पाठवणे शक्य झाले. या प्रात्यक्षिकासाठी, डेटा एका ट्रान्समिशन सिस्टिममधून 21 वेळा फिरवून (loop) एकूण 1,802 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यात आले. जरी या वेगाला अद्याप स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नसला, तरी भविष्यातील हाय-स्पीड कम्युनिकेशन आणि डेटा ट्रान्सफरसाठी हे संशोधन एक मैलाचा दगड ठरू शकते, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT