टोकियो : जपानला ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखले जाते. हा देश केवळ आपल्या प्रगत तंत्रज्ञानासाठीच नाही, तर अनोखी संस्कृती, शिस्त आणि लोकांच्या अविश्वसनीय कार्यक्षमतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे; पण जपानची एक गोष्ट अशी आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल - ती म्हणजे तेथील वेळेचे पालन. आश्चर्य म्हणजे, या देशात ट्रेन 30 सेकंदांपेक्षा जास्त उशीर करत नाहीत!
जपानमधील लोक वेळेचे किती पक्के असतात, हे त्यांच्या रेल्वे प्रणालीवरून स्पष्ट होते. जपानमध्ये धावणार्या बुलेट ट्रेनसह इतर सर्व ट्रेन सरासरी 30 सेकंदांपेक्षा जास्त उशीर करत नाहीत. जर एखादी ट्रेन काही कारणास्तव उशीर झाली, तर रेल्वे प्रशासन प्रवाशांची जाहीर माफी मागते आणि त्यांना तसे प्रमाणपत्रही देते, जेणेकरून त्यांना कामावर किंवा शाळेत पोहोचायला उशीर का झाला, हे सांगता येईल. वेळेवर काम करणे हा जपानी लोकांच्या जीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
जपानमधील काही सामाजिक नियम आणि परंपरा खूपच वेगळ्या आहेत. जपानमध्ये मुलांना 10 वर्षांचे होईपर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. या काळात त्यांना आपले बालपण मनसोक्त जगण्याची आणि जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याची संधी दिली जाते. भारतात जसे हात जोडून नमस्कार करतात, तसेच जपानमध्ये आदरातिथ्य म्हणून एकमेकांना वाकून अभिवादन करण्याची परंपरा आहे. जो व्यक्ती जितका जास्त आदरणीय, त्याच्यासमोर तितके जास्त वाकले जाते.
जपानमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलणे किंवा मोबाईलवर बोलणे असभ्य मानले जाते. लोक शांतता आणि इतरांच्या सोयीचा खूप विचार करतात. स्वच्छता हा जपानी संस्कृतीचा कणा आहे. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मिळून वर्गांची आणि शाळेची साफसफाई करतात. याच स्वच्छतेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैलीमुळे जपानमधील लोक दीर्घायुषी असतात. येथील लोकांचे सरासरी वय 82 वर्षे आहे, जे जगातील सर्वाधिक सरासरी वयांपैकी एक आहे.