विश्वसंचार

‘जेम्स वेब’ उलगडणार ‘त्या’ फुगीर ग्रहाचे रहस्य

Arun Patil

वॉशिंग्टन : 'वास्प-107 बी' हा अशा बाह्यग्रहांपैकी एक आहे, ज्याची घनता अतिशय कमी आहे. हा हलका ग्रह नुसताच फुगलेला असावा, असे संशोधकांना वाटते. आता या ग्रहाचे रहस्य 'नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपकडून उलगडले जाऊ शकते. शेजारच्या एका तार्‍याभोवती फिरणार्‍या या ग्रहामध्ये आश्चर्यकारकरीत्या मिथेनचा कमी साठा आहे. त्यामधूनच हे रहस्य उलगडू शकते, असे संशोधकांना वाटते.

अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधील मायकल लाईन या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 'जेम्स वेब' कडून मिळालेला डाटा आम्हाला अशा ग्रहांबाबतची अधिक माहिती देऊ शकतो. 'वास्प-107' सारख्या ग्रहांचा कोअर अतिशय लहान असतो आणि त्याभोवती निव्वळ वायूचा गोळा बनलेला असतो. या ग्रहाचा शोध 'वाईड अँगल सर्च फॉर प्लॅनेटस्' (वास्प) या वेधशाळेकडून 2017 मध्ये लावण्यात आला होता.

हा ग्रह पृथ्वीपासून 200 प्रकाशवर्ष अंतरावर कन्या तारकापुंजात आहे. आतापर्यंत शोधलेल्या सुमारे पाच हजार बाह्यग्रहांपैकी हा सर्वात कमी वजनाचा आहे. जरी तो आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूतक्या मोठ्या आकाराचा असला, तरी त्याचे वजन गुरूच्या केवळ बारा टक्के इतकेच आहे. हे वजन 30 पृथ्वीइतके आहे. एका गुरूचे वस्तुमान हे 318 पृथ्वीइतके असते. मात्र, हा बाह्यग्रह जितका मोठा दिसतो, तितकाच हलकाही आहे.

SCROLL FOR NEXT