विश्वसंचार

‘जेम्स वेब’ करणार युरेनस, शनीच्या ऑरोरांचे निरीक्षण

Arun Patil

वॉशिंग्टन : 'ऑरोरा' म्हणजे ध्रुवीय प्रदेशांच्या आसमंतात रंगणारा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा नैसर्गिक खेळ. पृथ्वीवरही ध्रुवीय वर्तुळात 'ऑरोरा' किंवा 'नॉर्दन लाईटस्' पाहायला मिळतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला सौरकण धडकले की असा ऑरोरा निर्माण होतो. अर्थात, ही घटना पृथ्वीवरच घडते, असे नाही. अन्यही ग्रहांच्या ध्रुवीय भागात ऑरोरा दिसतात. मात्र, युरेनस आणि शनी ग्रहाचे ऑरोरा नेहमीच कुतूहलाचा विषय बनून राहिलेले आहेत. आता दोन प्रोजेक्टस्मधून संशोधक युरेनस आणि शनीच्या ऑरोराचे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने निरीक्षण करणार आहेत.

लिसेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांकडून हे निरीक्षण केले जाणार आहे. वायूचा एक मोठा गोळा असलेल्या शनीच्या तसेच बर्फाळ युरेनसचा ऑरोरा पाहण्यासाठी दहा अब्ज डॉलर्स खर्च करून बनवलेल्या जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीचा वापर केला जाईल. लिसेस्टर युनिव्हर्सिटीतील हेन्रीक मेलीन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की जेम्स वेब टेलिस्कोपने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहे. सुरुवातीच्या काळातील आकाशगंगांपासून ते आपल्या सौरमालिकेतीलही अनेक न पाहिलेल्या गोष्टी या अंतराळ दुर्बिणीने समोर आणल्या. आता या दुर्बिणीच्या साहाय्याने शनी व युरेनसच्या ऑरोरांचे निरीक्षण करण्यात येईल. युरेनसच्या ऑरोराविषयी सध्या अतिशय कमी माहिती आहे. या ग्रहाचे वातावरण पाणी, अमोनिया आणि मिथेनने बनलेले आहे. शनीवरील 10.6 तासांच्या दिवसात तेथील उत्तर भागात घडणारा ऑरोराही यावेळी पाहण्यात येईल. त्यावेळी शनी फिरत असताना तेथील तापमानात होणारे बदलही नोंदवले जातील.

SCROLL FOR NEXT