वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नव्या निरीक्षणांमधून एका प्राचीन आकाशगंगेचा अतिनील प्रकाश पाहायला मिळाला आहे. ‘नेचर जर्नल’मध्ये प्रकाशित या शोधानुसार ब्रह्मांडातील पहिल्या तार्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणावर अपेक्षेपेक्षा आधीच परिणाम केला असावा.
‘बिग बँग’नंतर ब्रह्मांड प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनच्या गरम मिश्रणाने भरले होते. जसजसे ब्रह्मांड थंड होत गेले, तसतसे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र येऊन हायड्रोजन आयन तयार झाले. यानंतर हे हायड्रोजन आयन इलेक्ट्रॉनना आकर्षित करून तटस्थ हायड्रोजन अणूंचे ढग तयार करू लागले. हे ढग अतिनील प्रकाश शोषून घेत असल्याने ब्रह्मांडात प्रकाशाचा प्रसार होऊ शकत नव्हता. मात्र, पहिल्या तार्यांनी पुरेसा अतिनील प्रकाश उत्सर्जित केला, ज्यामुळे हायड्रोजन पुन्हा आयनीकृत झाला आणि प्रकाशाला मार्ग मिळाला. या कालखंडाला रीआयोनायझेशनचे युग म्हणतात. वैज्ञानिकांना अद्याप खात्री नाही की, ब्रह्मांडातील पहिल्या तारे केव्हा जन्मले किंवा रीआयोनायझेशन युग नेमके कधी सुरू झाले; मात्र नवीन संशोधन याचा आरंभकाल शोधण्यास मदत करू शकते.
जेम्स वेब दुर्बिणीच्या मदतीने वैज्ञानिकांनी JADES- GS- z13-1 नावाची एक प्राचीन आकाशगंगा निरीक्षित केली, जी पृथ्वीपासून इतक्या अंतरावर आहे की, ती ‘बिग बँग’नंतर अवघ्या 330 दशलक्ष वर्षांनंतर कशी दिसत होती, हे आपल्याला पाहता येते. वैज्ञानिकांना या आकाशगंगेच्या प्रकाशात लायमन-अल्फा उत्सर्जन दिसले, जे हायड्रोजनच्या आयनीकरणामुळे निर्माण होते. हा प्रकाश सुरुवातीला अतिनील स्वरूपात होता; परंतु 13 अब्जांहून अधिक वर्षांच्या ब्रह्मांडीय विस्तारामुळे तो अवरक्त पट्ट्यात परिवर्तित झाला आणि जेम्स वेबच्या संवेदकांनी तो टिपला.