वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा सर्वात दूरचा सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल म्हणजेच शक्तिशाली कृष्णविवर शोधल्याची शक्यता आहे. GHZ2 नावाच्या आकाशगंगेमध्ये असलेला हा प्रचंड मोठा ऑब्जेक्ट इतका दूर आहे की, खगोलशास्त्रज्ञांना तो बिग बँगनंतर केवळ 350 दशलक्ष वर्षांनी कसा दिसत होता, तसा दिसत आहे.
या टीमचे संशोधन अजून ‘पीअर-रिव्ह्यू’ झालेले नाही. 4 नोव्हेंबर रोजी ते ‘प्रीप्रिंट सर्व्हर arXiv’ वर अपलोड करण्यात आले. संशोधकांनी ‘जेम्स वेब’ च्या निअर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ आणि मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंट मधील निरीक्षणांचा वापर केला. या उपकरणांनी दूरच्या आकाशगंगेतून मुळात उत्सर्जित झालेला अल्ट्राव्हायोलेट आणि ऑप्टिकल प्रकाश पकडला, जो विश्वाच्या विस्तारामुळे खेचला जाऊन इन्फ्रारेडमध्ये रूपांतरित झाला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट ऑस्टिनमधील खगोलशास्त्र विभागाचे डॉक्टरेट उमेदवार आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक ऑस्कर चावेझ ऑर्टीझ यांनी सांगितले की, GHZ2 हे अशा वेळी अस्तित्वात आहे जेव्हा विश्व अत्यंत तरुण होते. त्यामुळे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आणि त्याच्या यजमान आकाशगंगेला एकत्र वाढण्यास तुलनेने कमी वेळ मिळाला. ‘ऑर्टीझ पुढे म्हणाले, ‘स्थानिक विश्वात, ब्लॅक होल आणि आकाशगंगा स्पष्टपणे सह-विकसित होतात. परंतु, इतक्या लवकरच्या युगात अशा प्रणालीचा शोध लागल्याने सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल इतक्या लवकर वस्तुमान कसे मिळवतात, याबद्दल प्रश्न निर्माण होतात.
‘इतक्या लवकर या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलची निर्मिती कशी झाली, याबद्दल दोन मुख्य परिकल्पना आहेत : ते ‘हलके बीज’ आहेत जे खूप वेगाने वाढतात. किंवा ते ‘जड बीज’ आहेत, ज्यांची सुरुवात मोठ्या वस्तुमानाने झाली, ज्यामुळे त्यांना वाढण्यासाठी अधिक सुरुवात मिळाली. GHZ2 चा शोध 2022 मध्ये लागला होता, तेव्हापासून खगोलशास्त्रज्ञांनी ‘जेम्स वेब’ चा वापर करून अनेक दूरच्या आकाशगंगा शोधल्या आहेत. तथापि, GHZ2 वेगळे ठरते. कारण, त्याच्या स्पेक्ट्रममध्ये खूप तीव ‘उत्सर्जन रेषा’ दिसतात. जेव्हा अणू किंवा आयनचे इलेक्ट्रॉन ऊर्जित होतात आणि नंतर विशिष्ट तरंगलांबीवर ऊर्जा सोडतात, तेव्हा हे तेजस्वी प्रकाशाचे पट्टे उत्सर्जित होतात. या रेषा GHZ2 ला ऊर्जा देणाऱ्या प्रक्रियेबद्दल महत्त्वाचे संकेत देतात.
युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटस् एमहर्स्टमधील खगोलशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक जॉर्ज झावाला यांनी स्पष्ट केले की, ‘आम्ही ज्या उत्सर्जन रेषांचे निरीक्षण करत आहोत, त्यांना तयार होण्यासाठी खूप जास्त ऊर्जा लागते आणि त्यांना ‘उच्च-आयनीकरण रेषा’ म्हणून ओळखले जाते.’ झावाला यांनी सांगितले की, वायूच्या आयनीकरण म्हणजेच वायूला उष्णता दिल्यावर अणू इलेक्ट्रॉन गमावून किंवा मिळवून आयनमध्ये रूपांतरित होतात, याबद्दलची सध्याची माहिती प्रामुख्याने जवळच्या स्टार-फॉर्मिंग प्रदेशांवर आधारित आहे आणि ती सहसा तीव उच्च-आयनीकरण रेषांसाठी योग्य नसते. या रेषा, आणि त्यांच्यातील संबंध, सहसा सक्रिय गॅलॅक्टिक न्यूक्लिआय मध्ये आढळतात, ज्यांच्या केंद्रस्थानी सक्रियपणे अन्न सेवन करणारे ब्लॅक होल असतात आणि तिथे खूप जास्त ऊर्जेचे रेडिएशन असते.