वॉशिंग्टनः जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे शोध लावलेले आहेत. ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील आकाशगंगा व कृष्णविवरांपासून ते अन्य खगोलांपर्यंतच्या अनेक अवकाशीय शोधांसाठी या शक्तिशाली स्पेस टेलिस्कोपने खगोलशास्त्रज्ञांना मदत केली आहे. आता या दुर्बिणीने एखाद्या हॅट किंवा टोपीच्या आकाराच्या ‘सोम्ब्ररो’ या आकाशगंगेत लपलेला जणू काही तार्यांच्या निर्मितीचा कारखानाच शोधून काढला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात तार्यांची निर्मिती होत आहे.
सोम्ब्ररो ही एक सर्पिलाकार आकाशगंगा असून, ती 30 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या आकाशगंगेचा शोध सर्वप्रथम सन 1781 मध्ये लावण्यात आला होता. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने या आकाशगंगेचे नव्याने व तपशीलवार निरीक्षण केले आहे. ही आकाशगंगा एखाद्या रुंद अशा मेक्सिकन हॅटसारखी दिसते. तिची हाय रिझोल्युशन आणि मिड-इन्फ्रारेड वेव्हलेंग्थसह अनेक छायाचित्रे या दुर्बिणीने टिपली आहेत. तिचा मध्यभाग अतिशय चमकदार असून, त्याभोवती धुळीचे दाट वर्तुळ आहे. मिड-इन्फ्रारेडमध्ये तिचे संपूर्णपणे वेगळेच रूप समोर येते. त्यामध्ये ती एखाद्या हॅटऐवजी बैलाच्या डोळ्यासारखी दिसते. तिची मऊ अंतर्गत डिस्क आणि बाहेरील वर्तुळही यामध्ये दिसते.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंट या उपकरणाने टिपलेल्या प्रतिमांमधून या आकाशगंगेचे अंतरंग समजते. तिच्या बाहेरील भागातील धुळीच्या वर्तुळातील गठ्ठे हे नव्या तार्यांच्या निर्मितीची ठिकाणे आहेत. त्याठिकाणी ‘मिल्की वे’ या आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत कमी प्रमाणात नव्या तार्यांची निर्मिती होत आहे. मात्र, हे ठिकाणच या आकाशगंगेतील जणू काही तार्यांच्या फॅक्टरीचे ठिकाण बनलेले आहे.