Ice Age Bird Figurines | हिमयुगातील पक्ष्यांच्या हस्तिदंती मूर्तींचा जर्मनीतील गुहेत शोध 
विश्वसंचार

Ice Age Bird Figurines | हिमयुगातील पक्ष्यांच्या हस्तिदंती मूर्तींचा जर्मनीतील गुहेत शोध

४० हजार वर्षांपूर्वीही पक्ष्यांच्या वर्तनाचे निरीक्षण!

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन : जर्मनीतील प्रागैतिहासिक होले फेल्स गुहेत सुमारे ४० हजार वर्षे जुन्या पक्ष्यांच्या दोन छोट्या मूर्ती सापडल्या आहेत. मॅमथच्या हस्तिदंतापासून कोरलेल्या या मूर्तींमुळे हिमयुगातील मानव केवळ निसर्गाचा साक्षीदार नव्हता, तर पक्ष्यांच्या हालचाली आणि वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करत होता, असे संकेत मिळाले आहेत. या दोन्ही मूर्ती २०२५ मध्ये उत्खननादरम्यान सापडल्या. त्या युरोपमधील सुरुवातीच्या संस्कृतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या ऑरिग्नेशियन कालखंडातील थरांमध्ये आढळल्या. दोन्ही मूर्ती एकमेकांपासून पाच फुटांपेक्षाही कमी अंतरावर सापडल्याने त्या एकाच कलाकाराने तयार केल्या असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या मूर्ती आकाराने अत्यंत लहान आहेत. प्रत्येकीची लांबी अर्ध्या इंचापेक्षाही कमी आहे. या काळातील बहुतांश मूर्ती साधारण एक ते चार इंच आकाराच्या आढळतात. त्यातील एक मूर्ती पूर्ण असून त्यात घरट्यावर बसलेल्या किंवा अंडी उबवणाऱ्या पक्ष्याचे चित्रण असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.

दुसरी मूर्ती अपूर्ण असून तिचे पंख पसरलेले आहेत. हा पक्षी उडत असावा, उतरत असावा किंवा प्रणयाच्या अवस्थेत असावा, अशी शक्यता आहे. या मूर्तींमध्ये पक्ष्यांच्या शरीररचनेचे अनेक सूक्ष्म आणि वैशिष्ट्यपूर्ण तपशील दिसून येतात. त्यामुळे त्या काळातील कलाकारांनी पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले असावे, असे पुरातत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही मूर्तींपैकी एक ‘टार्मिन’ या ग्राऊस कुटुंबातील (फॅमिली) पक्ष्याची असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, दुसरी मूर्तीही ‘टार्मिन’चीच आहे की अन्य पक्ष्यांची, याबाबत निश्चित निष्कर्ष निघालेला नाही. या दुर्मीळ मूर्ती जर्मनीतील ब्लाउबॉरेन येथील ‘म्युझियम ऑफ प्रिहिस्ट्री अँड आइस एज आर्ट’मध्ये एप्रिल २०२७ पर्यंत प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT