Baby gut Microbiome Study | बालवाडीत जाणार्‍या चिमुकल्यांच्या पोटातील दुनियाच बदलतेय!  
विश्वसंचार

Baby gut Microbiome Study | बालवाडीत जाणार्‍या चिमुकल्यांच्या पोटातील दुनियाच बदलतेय!

पुढारी वृत्तसेवा

रोम : लहान मुलांना बालवाडीत (नर्सरी) पाठवल्याने केवळ त्यांचे सामाजिक ज्ञानच वाढत नाही, तर त्यांच्या शरीरातील सूक्ष्मजीवसृष्टी (मायक्रोबायोम) देखील पूर्णपणे बदलून जाते, असा खळबळजनक खुलासा एका ताज्या संशोधनातून झाला आहे. इटलीतील संशोधकांनी एक वर्षभर 43 बालकांच्या पोटातील सूक्ष्म जंतूंचा (गटबॅक्टेरिया) अभ्यास केला. त्यांना असे आढळले की, मुले जेव्हा बालवाडीत एकत्र खेळतात, तेव्हा त्यांच्यातील बॅक्टेरियांची देवाणघेवाण वेगाने होते.

अवघ्या 4 महिन्यांच्या उपस्थितीनंतर एकाच बालवाडीतील मुलांमध्ये 15 ते 20 टक्के सूक्ष्म जंतू समान असल्याचे दिसून आले. या मुलांनी आपल्या कुटुंबाकडून जितके सूक्ष्म जंतू मिळवले होते, त्यापेक्षा जास्त जंतू त्यांनी बालवाडीतील मित्र-मैत्रिणींकडून मिळवले. मुलांच्या पोटातील मायक्रोबायोम वैविध्यपूर्ण होण्यासाठी त्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे विविध आजारांपासूनही संरक्षण मिळते. वैविध्यपूर्ण सूक्ष्म जंतू पोटातील आरोग्य सुधारतात आणि भविष्यात होणार्‍या अनेक संसर्गांपासून मुलांचे रक्षण करू शकतात, असे संशोधक सांगतात.

हे संशोधन करत असताना संशोधकांना अ‍ॅकरमॅन्सिया म्युसिनिफिला नावाचा एक बॅक्टेरिया आईकडून मुलाकडे गेला, त्या मुलाकडून बालवाडीतील दुसर्‍या मुलाकडे आणि तिथून त्याच्या पालकांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. अनेकांना वाटते की, मुले बाहेर गेल्यावर जंतूमुळे आजारी पडतील; पण हे संशोधन सांगते की, ही जंतूंची देवाणघेवाण मुलांच्या शरीरातील सूक्ष्मजीवसृष्टी समृद्ध करण्यासाठी गरजेची आहे. ज्या मुलांचे मोठे भाऊ किंवा बहीण घरी आहेत, त्यांच्यात आधीच चांगली प्रतिकारशक्ती असते; मात्र एकुलत्या मुलांसाठी बालवाडी ही एक आरोग्यवर्धक शाळा ठरत आहे. संशोधक निकोला सेगाटा यांच्या मते, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती या वयात नवीन जंतू स्वीकारण्यासाठी तयार असते. बालवाडीतील सामाजिक संपर्क हा केवळ खेळासाठी नसून तो एक निरोगी शरीर घडवण्याचा काळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT