Italian Hospital History | काल्पनिक आजाराचा शोध लावून इटालियन रुग्णालयाने ‘ज्यूं’चे वाचवले होते प्राण 
विश्वसंचार

Italian Hospital History | काल्पनिक आजाराचा शोध लावून इटालियन रुग्णालयाने ‘ज्यूं’चे वाचवले होते प्राण

नाझी सैन्याला चकवणारी रंजक ऐतिहासिक कथा

पुढारी वृत्तसेवा

रोम : दुसर्‍या महायुद्धादरम्यान हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या क्रूर नाझी सैन्याला हुलकावणी देण्यासाठी इटलीतील काही धाडसी डॉक्टरांनी एका अनोख्या काल्पनिक आजाराचा शोध लावला होता. रोममधील एका रुग्णालयाने के सिंड्रोम नावाचा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार पसरल्याची खोटी माहिती पसरवून शेकडो ज्यू आणि फॅसिस्टविरोधी नागरिकांना नाझींच्या छळछावणीतून वाचवले होते.

के सिंड्रोमचा रंजक इतिहास

1943 च्या अखेरीस जेव्हा नाझी सैन्याने रोममधील ज्यू वस्त्यांवर छापे टाकून हजारो लोकांना बंदी बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी रोममधील टायबर नदीच्या बेटावर असलेल्या फेटेबेनेफ्राटेली रुग्णालयात आश्रय घेतला. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जिओव्हानी बोरोमियो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या निर्वासितांना नाझींपासून वाचवण्यासाठी एक नामी युक्ती शोधली. त्यांनी रुग्णालयाच्या कागदपत्रांमध्ये या निरोगी लोकांच्या नावापुढे के सिंड्रोम या आजाराचा उल्लेख केला. हा आजार टीबीसारखाच अत्यंत संसर्गजन्य असून यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती त्यांनी नाझी सैनिकांच्या मनात भरवली. हा आजार केवळ काल्पनिकच नव्हता, तर त्याचे नाव नाझी कमांडर अ‍ॅल्बर्ट केसेलिंग आणि रोमचा नाझी पोलीस प्रमुख हर्बर्ट कॅपलर यांच्या नावातील या आद्याक्षरावरून ठेवण्यात आले होते. हा डॉक्टरांनी नाझींच्या नकळत घेतलेला एक धाडसी टोमणा होता.

भीतीपोटी नाझी सैनिकांची माघार

ऑक्टोबर 1943च्या अखेरीस जेव्हा नाझी सैनिक ज्यूंचा शोध घेत रुग्णालयात तपासणीसाठी आले, तेव्हा डॉ. बोरोमियो यांनी त्यांना रुग्णालयात फिरवून के सिंड्रोम या आजाराच्या भयानक परिणामांची सविस्तर माहिती दिली. संसर्गाच्या प्रचंड भीतीमुळे, नाझी सैन्यासोबत आलेल्या डॉक्टरांनी आणि सैनिकांनी वॉर्डमध्ये आत जाऊन तपासणी करण्यास साफ नकार दिला आणि ते तिथून पसार झाले. हे रुग्णालय कॅथोलिक चर्चच्या अधिपत्याखाली असल्याने ते खासगी मानले जात होते. त्यामुळे तिथे सरकारी नियम लागू नव्हते. डॉ. बोरोमियो यांनी तिथे अनेक ज्यू डॉक्टरांना कामावर ठेवले होते. या रुग्णालयात केवळ रुग्णांना लपवले गेले नाही, तर तिथे एक गुप्त रेडिओ स्टेशनही उभारण्यात आले होते, ज्याच्या माध्यमातून फॅसिस्टविरोधी सैनिकांना नाझींविरुद्ध लढण्यासाठी संदेश पाठवले जात होते. दोस्त राष्ट्रांचे सैन्य रोममध्ये येऊन शहराची मुक्तता करेपर्यंत हे रुग्णालय निर्वासितांना आश्रय देत राहिले. या महान कार्यासाठी आणि शेकडो ज्यूंचे प्राण वाचवण्यासाठी डॉ. जिओव्हानी बोरोमियो यांना मरणोत्तर इस्रायल सरकारतर्फे राईटस अमंग द नेशन्स या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT