वाळवंटाच्या मोरोक्कोमधील भागात जोरदार पाऊस झाला Pudhari Photo
विश्वसंचार

चक्क सहारा वाळवंटात पडला जोरदार पाऊस

पुढारी वृत्तसेवा

रबात ः सहारा वाळवंटात चक्क हिमवृष्टी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आता जगातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वाळवंटाच्या मोरोक्कोमधील भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने वाळूच्या टेकड्या आणि पाम वृक्ष पाण्यात बुडाले. अनेक दशकांमध्ये झाला नाही, इतका पाऊस यावेळी झाला आणि अतिशय कोरड्या असलेल्या या वाळवंटाला काहीसे ओले केले. आग्नेय मोरोक्कोमध्ये असणार्‍या सहारा वाळवंटाच्या भागात हा पाऊस पडला. जगातील अतिशय कोरड्या व उष्ण भागांमध्ये या ठिकाणाचा समावेश होतो. याठिकाणी उन्हाळ्याच्या अखेरीस पाऊस पडण्याच्या घटना अतिशय दुर्मीळ आहेत. मोरोक्को सरकारने म्हटले आहे, की सप्टेंबरच्या अखेरीस या भागात दोन दिवस मुसळधार पाऊस पडला.

त्यामुळे एरवी वर्षाला 250 मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस होणार्‍या या भागातील वार्षिक सरासरीचे प्रमाण वाढले. राजधानी रबातपासून 450 किलोमीटर दक्षिणेला असलेल्या टॅगौनाईट या गावात 24 तासांच्या काळातच 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. या पावसाने झागोरा व टाटा या दरम्यान असलेले आणि गेल्या 50 वर्षांपासून कोरडे पडलेले लेक इरीक्वी हे सरोवरही काठोकाठ भरले. हे या वाळवंटातील एक ओअ‍ॅसिस आहे. वादळांमुळे निर्माण होणार्‍या अशा पावसाने पुढे अनेक महिने येथील वातावरण आर्द्रतायुक्त राहील. मोरोक्कोमध्ये सलग सहा वर्षे दुष्काळ पडला होता व त्यामुळे परिस्थिती बिकट बनली होती. आता या पावसाने तेथील शेतीला व पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या 30 ते 50 वर्षांच्या काळात अतिशय कमी काळात मोठा पाऊस होण्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचे मोरोक्कोच्या हवामान विभागाचे हाऊसिन युआबेब यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT