लंडन : बॉडी पेन अथवा अंगदुखीपासून आराम मिळावा म्हणून बहुतेक लोक पेनकिलर्स घेण्यावर भर देतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्याशिवाय अतिप्रमाणात पेनकिलर्स घेणे प्रसंगी आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष सुमारे 70 हजार महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. पेनकिलर्सच्या नियमित सेवनाने महिलांमध्ये कानासंबंधीच्या समस्या वाढू शकतात, असेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
बर्मिंघम अँड वूमन्स हॉस्पिटलमधील संशोधकांनी केलेल्या या संशोधनात असेही आढळून आले की, पेनकिलर्सचे अतिप्रमाणात सेवन केल्याने महिलांमध्ये टिनिट्सची (कानासंबंधीची समस्या) बळावण्याचा धोका 20 टक्के जास्त असतो. हे संशोधन 'जर्नल ऑफ जनरल इंटरनल मेडिसीन'मध्ये प्रसिद्ध केले आहे.
संशोधनातील माहितीनुसार, आठवड्यात सहा किवा सातवेळा अॅस्पिरिनचा डोस घेतल्यानेही टिनिट्सचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो. 2018 मधील ब्रिटिश टिनिट्स असोसिएशनच्या अंदाजानुसार, यूकेतील सुमारे 60 लाख लोक कानासंबंधीच्या समस्यांनी त्रस्त आहेत. त्यानंतरच्या काळात यामध्ये आणखी 10 टक्यांनी वाढ झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कानामध्ये वेगवेळ्या प्रकारचे आवाज येण्यास टिनिट्स असे म्हटले जाते.