चवळीला पालवी, डॉकिंग प्रक्रिया होणार उद्या Pudhari File Photo
विश्वसंचार

चवळीला पालवी, डॉकिंग प्रक्रिया होणार उद्या

इस्रोने अंतराळात वनस्पती वाढविण्यात हे यश

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर रोपे उगवण्याबाबतचे अनेक प्रयोग होत असतात. लेट्युससारख्या भाज्या उगवण्याचे प्रयोगही तिथे यशस्वी झालेले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ही आता आपले असेच स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी श्रीहरिकोटा येथून ‘स्पेडेक्स’ म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती. त्यावेळी सोबत पाठवलेल्या चवळीच्या बियांना आता पाने आली आहेत. इस्रोने नुकतेच त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. दोन दिवसांपूर्वी त्याच्या उगवणीचा फोटोही समोर आला होता. इस्रोने POEM-4 ( PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल) वर CROPS (कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज) द्वारे अंतराळात वनस्पती वाढविण्यात हे यश मिळविले आहे. मंगळवारी होणारी डॉकिंग प्रक्रिया आता 9 जानेवारीला होणार आहे.

CROPS ची रचना विक्रम साराभाई स्पेस सेंटर ( VSSC) येथे करण्यात आली आहे. प्रयोगासाठी चवळीची निवड करण्यात आली. कारण ती वेगाने उगवते. त्याच वेळी इस्रोच्या स्पेसेक्स मिशनचा 7 जानेवारीला नियोजित डॉकिंग कार्यक्रम 9 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. इस्रोच्या मते, मिशनला ग्राऊंड सिम्युलेशन अर्थात सतत चाचणी आणि विश्लेषणाद्वारे प्रमाणीकरण आवश्यक आहे. ISRO ने SpaDeX म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून लाँच केली होती. दोन अंतराळयान - SDX01 (चेझर) आणि SDX02 (लक्ष्य) PSLV- C60 रॉकेटसह पृथ्वीपासून 475 किमी वर तैनात करण्यात आले. दोन्ही अंतराळयानांचे एकूण वजन 440 किलो आहे. या मोहिमेअंतर्गत 9 जानेवारी रोजी बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने प्रवास करणारी ही दोन अंतराळयाने एकमेकांना जोडली जाणार आहेत. हे अभियान यशस्वी झाले तर रशिया, अमेरिका आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. भारताचे चांद्रयान-4 या मोहिमेच्या यशावर अवलंबून आहे, ज्यामध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. चांद्रयान-4 मोहीम 2028 मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. 4 जानेवारी रोजी, चेझर मॉड्यूलने इन-ऑर्बिट स्पेस सेल्फी व्हिडीओ रेकॉर्ड केला. पाठलाग करणारा लक्ष्याच्या दिशेने जात असताना हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. अंतराळातील अचूक डॉकिंगची पडताळणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे आणि मिशन योग्य दिशेने जात असल्याचा पुरावा हा व्हिडीओ आहे. दोन्ही स्पेसक्राफ्टच्या डॉकिंगचा रिअल टाईम व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला जाईल. संशोधन आणि विकासाशी संबंधित 24 पेलोडदेखील सोबत पाठवण्यात आले आहेत. हे पेलोड पृथ्वीपासून 700 किमी उंचीवर डॉक केलेले आहेत. यापैकी 14 पेलोडस् इस्रोचे आहेत आणि उर्वरित 10 स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांचे आहेत. यापैकी एक आहे Amity Plant Experimental Module in Space (APEMS) पेलोड, जो Amity University ने तयार केला आहे. अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचे संशोधन केले जाईल. या संशोधनांतर्गत अवकाशात आणि पृथ्वीवर एकाच वेळी प्रयोग केले जाणार आहेत. पालकाच्या पेशींना सूर्यप्रकाश आणि पोषक तत्त्वे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी एलईडी लाईटस् आणि जेलच्या माध्यमातून पुरवल्या जातील. कॅमेरा वनस्पती पेशींचा रंग आणि वाढ रेकॉर्ड करेल. जर सेलचा रंग बदलला तर प्रयोग अयशस्वी होईल. चवळीमध्ये उगवण झाल्याच्या बातमीने पालकावरील संशोधन यशस्वी होण्याच्या आशा वाढल्या होत्या. हे प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात आणि पृथ्वीवरील कृषी तंत्रात सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. तसेच मंगळ मोहिमेसारख्या लांब अंतराळ प्रवासादरम्यान भारतीय शास्त्रज्ञ वनस्पती वाढवण्याच्या शक्यतेला आणखी बळकटी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT