‘या’ बेटावर राहतात 20 माणसं, दहा लाख पक्षी! Pudhari File Photo
विश्वसंचार

‘या’ बेटावर राहतात 20 माणसं, दहा लाख पक्षी!

उत्तर ध्रुवाकडील सगळ्यात शेवटची आणि एकमेव जागा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी बेटं आहेत. त्यामध्ये सापांचे बेट, सशांचे बेट, बाहुल्यांचे बेट अशा अनेक बेटांचा समावेश होतो. आईसलँडच्या उत्तरेला असलेले 6.5 चौरस किलोमीटर आकाराचं ग्रिम्से बेट हे मानवी वस्ती असणारं उत्तर ध्रुवाकडील सगळ्यात शेवटची आणि एकमेव जागा आहे. या बेटावर अवघी 20 माणसं राहतात आणि दहा लाख पक्ष्यांचा तिथे नैसर्गिक अधिवास आहे.

एका थंडगार, दुर्गम देशाचा हा आणखी थंडगार दुर्गम भाग. इथं पोहोचणंही तितकंच कठीण. फारसा मानवी संपर्क नसलेल्या जागांची आवड असणार्‍यांनीच इथं यायचं धाडस करावं. एक छोटीशी नाव हा 1931 पर्यंत ग्रिम्सेपर्यंत पोहोचायचा एकमेव मार्ग होता. वर्षातून दोनच वेळा या बोटीतून इथून पत्रव्यवहार करता यायचा. पण, आता आकुरेरी या आईसलँडमधल्या शहरातून 20 मिनिटं विमान प्रवास आणि पुढे डाल्विक गावातून तीन तासांचा नावेने प्रवास केला की, साहसी प्रवाशांना या खडकाळ, दुर्गम बेटावर येता येतं. इथं येणारे बरेच जण युरोपमधलीत दुर्लक्षित राहिलेली वस्ती आणि रंगीबेरंगी पक्षी बघायची उत्सुकता असलेले असतात. या बेटावर कॅमिकेझ आर्क्टिक टर्न आणि पफिन पक्ष्यांशिवाय, काळ्या पायांचे किट्टीवाक, रेझरबिल्स आणि गिलेमोट असे अनेक पक्षी इथं मुक्तपणे फिरत असतात. हे शांत, प्रसन्न बेट घोड्यांचं आणि शेळ्या मेंढ्यांचंही घर आहे. समुद्र पक्ष्यांची संख्या तर इतकी की, मोजले तर प्रत्येक एका रहिवाशामागे 50,000 पक्षी भरतील. आईसलँडमध्ये विजेसाठी भूऔष्णिक आणि अक्षय ऊर्जेचा वापर केला असला, तरी ग्रिम्से बेट इतकं लांब आहे की, ते राष्ट्रीय ऊर्जेचं जाळं तिथंपर्यंत पोहोचवता येत नाही. त्यामुळे हे बेट एका डिझेल जनरेटरवर चालतं. ग्रिम्सेला भेट द्यायचा सुयोग्य काळ म्हणजे 10 एप्रिल ते 10 ऑगस्ट. त्यावेळी पफिन्स पक्षी ग्रिम्सेत आलेले असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT