टोकिओ : जपानमधील सर्वात पवित्र मानले जाणारे शिंतो मंदिर इसे जिंगू सध्या एका ऐतिहासिक सोहळ्याच्या उंबरठ्यावर आहे. 1300 वर्षांपासून चालत आलेली शिकीनेन सेंगू ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून, यामध्ये संपूर्ण मंदिर पाडून नवीन बांधले जाते. दर 20 वर्षांनी होणारा हा सोहळा अनुभवण्याची संधी पर्यटकांना आणि भाविकांना 2025 ते 2033 या काळात मिळणार आहे.
या मंदिराचा इतिहास 2,000 वर्षांपूर्वीचा आहे. हे मंदिर सूर्यदेवता अमातेरासूला समर्पित आहे. जपानच्या राजघराण्यातील तीन मुख्य चिन्हांपैकी एक असलेला याता नो कागामी हा कांस्य आरसा या मंदिरात जतन केलेला आहे. हे मंदिर नायकू आणि गेकू (अशा दोन मुख्य भागांत विभागलेले असून, एकूण 125 लहान-मोठी मंदिरे यात आहेत.
दर 20 वर्षांनी का बांधले जाते मंदिर?
जपानच्या शिंतो धर्मात तोकोवाका नावाची एक संकल्पना आहे, ज्याचा अर्थ सतत नवीन होऊन चिरतरुण राहणे असा होतो. मंदिर पुन्हा बांधल्यामुळे लाकूडकाम, वस्त्रकला आणि दागिने बनवण्याचे पारंपरिक कौशल्य नव्या पिढीकडे हस्तांतरित होते. जुन्या मंदिराचे खांब इतर लहान मंदिरांसाठी किंवा प्रवेशद्वारांसाठी (तोरी गेट) वापरले जातात. नवीन मंदिर बांधल्याने तिथे नवीन ऊर्जा संचारते, अशी श्रद्धा आहे.