इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बिलावल हे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बिलावल यांनी स्वत: या चर्चेसंदर्भात उघडपणे भाष्य केलं आहे. ऑस्ट्रियन राजघराण्यातील तरुणीशी बिलावल यांचा विवाह होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच बिलावल यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक पोस्टमध्ये बिलावल यांच्या साखरपुड्याच्या किंवा ऑस्ट्रियन राजघराण्यातील तरुणीशी विवाह करणार असल्याच्या बातम्यांवर बिलावल व्यक्त झाले आहेत. बिलावल हे युरोपमधील ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडदरम्यानच्या लिचटेनस्टेन या छोट्याशा स्वायत्त राज्यातील ‘प्रिन्सेस ग्लोरिया’ यांच्याशी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. आता बिलावल यांनी त्यांच्या लग्नाच्या तसेच साखरपुड्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नसताना सोशल मीडियाने माझा ‘साखरपुडा आणि विवाह’ ‘प्रिन्सेस ग्लोरिया’सोबत उरकून टाकल्याचे बिलावल यांनी म्हटले आहे. यावरूनच व्यक्त होताना बिलावल यांनी खऱ्या मुद्द्यांवर अधिक बोललं पाहिजे, अशा मुद्द्यांवर अधिक बोलणं अधिक गरजेचं आहे ज्याचा थेट लोकांवर परिणाम होतो, असंही बिलावल म्हणाले.
इस्लामाबादमधील ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ रुग्णालयामध्ये (पीआयएमएस) 14 नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेवरून शाहबाज शरीफ सरकारवर बिलावल यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, देशासमोरील गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियावरील नसत्या गोष्टींना महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही बिलावल यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. ते म्हणाले, ‘मला हे स्पष्ट करायचे आहे की, ना माझे लग्न ठरले आहे आणि ना माझा साखरपुडा झाला आहे. तसेच, ‘प्रिन्सेस ग्लोरिया’ नावाची कोणतीही व्यक्ती मला माहित नाही.’ आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतचा कोणताही निर्णय आपले कुटुंबच जाहीर करेल, असेही त्यांनी नमूद केले.