वॉशिंग्टन : सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा घटक आहे. पृथ्वीपेक्षा 100 पटीने जास्त रुंदी असलेल्या या अवाढव्य तार्याला वैज्ञानिक परिभाषेत अनेकदा ‘ड्वार्फ स्टार’ किंवा ‘बटू तारा’ म्हटले जाते. हे ऐकायला थोडे विचित्र वाटत असले, तरी खगोलशास्त्राच्या भाषेत हे पूर्णपणे सत्य आहे.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, तांत्रिकद़ृष्ट्या सूर्य हा G- type main- sequence तारा आहे, ज्याला ‘G2 V’ असेही संबोधले जाते. येथील ‘ V’ हे अक्षर तो एक बटू (Dwarf) तारा असल्याचे दर्शवते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला डॅनिश खगोलशास्त्रज्ञ एजनार हर्ट्झस्प्रंग यांनी पाहिले की, लाल रंगाचे काही तारे खूप तेजस्वी होते तर काही खूप फिकट. त्यांनी तेजस्वी तार्यांना ‘राक्षसी’ (Giants) आणि कमी प्रकाश असलेल्यांना ‘बटू’(Dwarfs) असे नाव दिले. सूर्याचा आकार आणि प्रखरता ही ‘लाल बटू’ (Red Dwarfs) तार्यांशी अधिक मिळतीजुळती असल्याने, सूर्याचे वर्गीकरणही बटू तार्यांच्या श्रेणीत करण्यात आले.
आपण लहानपणापासून सूर्याचा रंग पिवळा पाहत आलो आहोत; पण विज्ञानानुसार हे एक चुकीचे संबोधन आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्याचा खरा रंग पांढरा आहे. सूर्य सर्व द़ृश्य रंगांचे उत्सर्जन करतो, ज्यांच्या एकत्रित मिश्रणामुळे पांढरा प्रकाश तयार होतो. पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्य आपल्याला पिवळसर दिसतो. वातावरणातील रेणू सूर्याच्या पांढर्या प्रकाशातील वेगवेगळ्या रंगांचे विखुरण करतात, ज्यामुळे तो पिवळा भासतो. (याच कारणामुळे आपल्याला आकाश निळे दिसते.) सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 5,525 अंश सेल्सिअस (9,980 फॅरेनहाईट) आहे. खगोलशास्त्रामध्ये ‘G’ हा कोड ‘पिवळ्या’ तार्यांसाठी वापरला जातो, ज्यांचे तापमान साधारणपणे 5,125 ते 5,725 अंश सेल्सिअस दरम्यान असते. ‘मेन-सिक्वेन्स’ तार्यांमध्ये रंगाचा संबंध त्यांच्या वस्तुमानाशी (Mass) असतो. कमी वस्तुमान असलेले तारे केशरी किंवा लाल दिसतात, तर जास्त वस्तुमान असलेले तारे निळ्या रंगाचे दिसतात. सूर्य हा या दोन्हीच्या मधल्या श्रेणीत येतो.