Mysterious Space Object | पृथ्वीकडे येणारी ‘ती’ वस्तू म्हणजे चार दशकांपूर्वी हरवलेले अंतराळयान? 
विश्वसंचार

Mysterious Space Object | पृथ्वीकडे येणारी ‘ती’ वस्तू म्हणजे चार दशकांपूर्वी हरवलेले अंतराळयान?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीवरून जाणारा एक साधा अंतराळ खडक (space rock) मानला जाणारा एक गूढ गोल आता अनाकलनीय वेगाने पुढे जात असून, शास्त्रज्ञांकडे याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांचा समावेश असलेल्या एका नवीन अध्ययनात असे दिसून आले आहे की, ‘१९९८ केवाय २६’ (1998 KY26) नावाचा हा कथित लघुग्रह अशा वेगाने पुढे जात आहे, ज्याचे समर्थन सूर्य किंवा इतर ग्रहांचे गुरुत्वाकर्षण करू शकत नाही. सोप्या शब्दात सांगायचे तर, हा खडक आपल्या सूर्यमालेत फिरत असताना त्याला पुढे नेण्यासाठी इतर काहीतरी ऊर्जा कारणीभूत ठरत आहे.

पृथ्वीजवळून जाणारे खडक हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे खडक असतात, जे कधीकधी पृथ्वीच्या जवळ येतात. या वस्तूची लांबी अंदाजे ३६ फूट (एका शालेय बस एवढी) असून ती दर ५.३५ मिनिटांनी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. एका अंतराळ खडकासाठी हा वेग अत्यंत तीव्र आहे. सध्या ही वस्तू पृथ्वीपासून सुमारे १८९ दशलक्ष मैलांच्या अंतरावर असली, तरी २०२८ मध्ये ती पृथ्वीपासून ३२ दशलक्ष मैलांच्या आत येणार आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या मते, २०३९ मध्ये हा खडक आणखी जवळून जाईल आणि पृथ्वीपासून १० दशलक्ष मैलांच्या अंतरावर येईल. '१९९८केवाय २६' हा एक अगदी लहान खडक असल्याचे मानले जात असले तरी, त्याच्या वेगातील या अनाकलनीय वाढीमुळे एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे की ही गूढ वस्तू खरोखरच चार दशकांपूर्वी हरवलेले एक अंतराळयान आहे. हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अवी लोएब यांनी असा सिद्धांत मांडला आहे की, ही वस्तू म्हणजेच सोव्हिएत युनियनने १९८८ मध्ये अवकाशात प्रक्षेपित केलेले ‘फोबॉस १’ (Phobos 1) हे अंतराळयान आहे.

मंगळाच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याचा संपर्क तुटला होता आणि ते गायब झाले होते; परंतु ‘१९९८केवाय २६' चा आकार आणि त्याच्या रहस्यमय हालचालींवरून हे खरोखरच ते हरवलेले अंतराळयान असावे, असा विश्वास प्राध्यापक लोएब यांना वाटतो. २०२३ मध्ये, गेल्या २५ वर्षांतील टेलिस्कोप डेटाचे विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञांच्या पहिल्यांदाच लक्षात आले होते की, हा खडक नेहमीपेक्षा वेगाने हलत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT