रोम : सुमारे २,००० वर्षांचा इतिहास असलेले आणि जगातील सर्वात मोठे घुमट असलेले रोमचे ‘पँथिऑन’ हे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना मानले जाते. ही वास्तू एक महाकाय सूर्यघड्याळ किंवा सौर कॅलेंडर असू शकते, असा एक नवा सिद्धांत समोर आला आहे. घुमटाच्या मध्यभागी असलेले २७ फूट रुंदीचे वर्तुळाकार छिद्र, ज्याला ‘ऑक्यूलस’ म्हटले जाते, ते केवळ या इमारतीत प्रकाश किंवा हवा येण्यासाठी नाही, तर एका विशिष्ट खगोलीय रचनेचा भाग असल्याचे अभ्यासात आढळले आहे.
क्लासिसिस्ट रॉबर्ट हॅना आणि आर्किओ-ॲस्ट्रोनॉमर जुलिओ मॅग्ली यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार, ‘पँथिऑन’ची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, ऑक्यूलसद्वारे आत येणारा एकमेव सूर्यप्रकाश दुपारी १२ च्या सुमारास आणि विशिष्ट महत्त्वाच्या दिवशी इमारतीच्या दरवाजाला तंतोतंत प्रकाशित करतो. वसंत आणि शरद ऋतूतील विषुव दिनाला (इक्विनॉक्सिझ) म्हणजेच वर्षातून दोनदा येणारा असा काळ जेव्हा दिवस आणि रात्र समान (प्रत्येकी १२ तासांचे) असतात. तसेच, २१ एप्रिलला (रोम शहराचा पारंपरिक वर्धापन दिन) सूर्याचा प्रकाश थेट ‘पँथिऑन’च्या मुख्य प्रवेशद्वारावर पडतो.
प्राचीन काळात रोमचे सम्राट स्वतःला देवाचे रूप किंवा सूर्याशी जोडलेले मानत असत. २१ एप्रिलच्या दुपारी जेव्हा सम्राट पँथिऑनच्या दरवाजातून आत प्रवेश करत असे, तेव्हा सूर्याचा लखलखता प्रकाश थेट त्याच्यावर पडत असे. यामुळे तो एखाद्या ‘दैवी’ तेजाने उजळून निघाल्यासारखा दिसत असे आणि त्याची साम्राज्यवादी सत्ता अधिक प्रभावीपणे बिंबवली जात असे.
रॉबर्ट हॅना यांनी आपल्या ‘टाईम इन अँटिक्विटी’ या पुस्तकात म्हटले आहे की, प्राचीन काळातील दगडी सूर्यघड्याळांप्रमाणेच ‘पँथिऑन’च्या आतील प्रकाशाच्या स्थानावरून वेळ आणि महिना ओळखता येत असे. प्राचीन रोमध्ये ‘कॅलेंडर, सम्राट आणि धर्म’ या तिन्ही गोष्टी एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेल्या होत्या. सम्राट हा केवळ प्रशासक नव्हता तर मुख्य पुजारी आणि कॅलेंडरचा नियंत्रकही होता. त्यामुळे ‘पँथिऑन’ ही केवळ एक धार्मिक इमारत किंवा मंदिर नसून, ती सम्राटाची ताकद, खगोलशास्त्र आणि कॅलेंडरचे महत्त्व दाखवणारे एक महाकाय सौर कॅलेंडर असावे, अशी मजबूत शक्यता या अभ्यासातून व्यक्त केली जात आहे.