Octopus brain similar to human brain | ऑक्टोपसचा मेंदू मानवासारखाच असतो का? 
विश्वसंचार

Octopus brain similar to human brain | ऑक्टोपसचा मेंदू मानवासारखाच असतो का?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : निसर्गाच्या किमयेपुढे विज्ञान अनेकदा नतमस्तक होते. मानवाप्रमाणेच कणा असलेल्या प्राण्यांकडे प्रगत मेंदू असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र, कवचाशिवाय असलेल्या आणि कणा नसलेल्या 'ऑक्टोपस'सारख्या प्राण्यांनी बुद्धिमत्तेची एक वेगळीच उंची गाठली आहे. ६०० दशलक्ष वर्षांच्या स्वतंत्र उत्क्रांतीनंतरही या 'एलियन' सदृश प्राण्यांच्या बुद्धिमत्तेने शास्त्रज्ञांना चकित केले आहे.

मानवी मेंदू हा कवटीच्या आत सुरक्षित असतो, मात्र ऑक्टोपसची रचना पूर्णपणे भिन्न आहे. डोनटच्‍या आकारासारखा ऑक्टोपसचा मुख्य मेंदू त्यांच्या अन्ननलिकेभोवती गुंडाळलेला असतो. ऑक्टोपसच्या एकूण मज्जातंतूंपैकी ५०% हून अधिक मज्जातंतू त्यांच्या आठ हातांमध्ये असतात. याचा अर्थ त्यांचे हात स्वतंत्रपणे विचार करू शकतात आणि हालचालींचे नियोजन करू शकतात.

मानवाशी असलेले साम्य

जरी मानव आणि ऑक्टोपस यांचा पूर्वज एखादा साध्या मज्जासंस्थेचा किडा असला, तरी आज त्यांच्यात काही अजब साम्य आढळते. ऑक्टोपसचे डोळे मानवी डोळ्यांसारखेच दिसतात, जरी त्यांच्या मेंदूतील दृश्य प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असली तरीही. ऑक्‍टोपसकडे अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मृती साठवण्याची क्षमता असते. तसेच प्रचंड संयमही असतो. उत्तम फळाच्या अपेक्षेने प्रतीक्षा करण्‍याची संयमीवृत्ती त्‍याच्‍याकडे असते. चांगले अन्न मिळवण्यासाठी वाट पाहणे हे त्‍याच्‍याबाबतचे उदाहरणही संशोधकांना दिसले आहे.

बुद्धिमत्तेचे वेगळे पैलू

ऑक्टोपस समस्या सोडवण्यासाठी समुद्रातील विविध वस्तूंचा (उदा. नारळाची करवंटी) वापर करतात. जपानमधील संशोधनानुसार, ऑक्टोपस झोपेत असताना त्यांच्या त्वचेचा रंग झपाट्याने बदलतात, ज्यावरून ते मानवाप्रमाणे स्वप्ने पाहत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. आपली त्वचा परिसराप्रमाणे बदलण्यासाठी त्यांचा मेंदू अत्यंत क्लिष्ट गणिते सोडवतो.

शास्त्रज्ञांच्या मते, ऑक्टोपसचा अभ्यास केल्याने आपल्याला दोन गोष्टी समजतील. एकतर बुद्धिमत्ता विकसित होण्याचे काही मूलभूत वैश्विक नियम आहेत किंवा निसर्गाकडे बुद्धिमान मेंदू तयार करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत.तथापि, हे प्राणी अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांच्यावरील प्रयोगांसाठी आता कडक नैतिक नियमांची गरज भासत आहे. त्यांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संशोधक आता नवीन मार्ग शोधत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT