नवी दिल्ली : ‘ड’ जीवनसत्त्वाचा एक उत्तम स्रोत म्हणजे मशरुम किंवा आळिंबी. एरवी हॉटेलमध्येच मशरुमचे पदार्थ मिळत असत, पण हल्ली अनेक घरांमध्ये बटण मशरुमच्या भाज्या बनवल्या जातात व लोक मिटक्या मारत खातात! अनेकांना मशरुम हे शाकाहारात मोडते की मांसाहारात हे समजत नाही. खरे तर ते यापैकी कशामध्येही येत नाही. याचे कारण म्हणजे ते वनस्पतीही नाही आणि प्राणीही नाही! ते बुरशीच्या (Fungi) वर्गात येतात! अर्थात मशरुममध्ये खाण्यास योग्य व अयोग्य असे दोन्ही प्रकार असतात.
मशरूममध्ये पानं, फुले किंवा बीया नसतात, त्यामुळे ते वनस्पतींपेक्षा वेगळे असतात. मात्र, त्यात कोणतेही प्राणीजन्य घटक नसतात, त्यामुळे शाकाहारी आहारामध्ये ते समाविष्ट केले जाते. काही कट्टर शाकाहारी किंवा धार्मिक लोक मशरूम खाणे टाळतात. याचे एक कारण म्हणजे त्यांचा पोत मांसाहारी पदार्थांसारखा असतो. पण पौष्टिकद़ृष्ट्या आणि वैज्ञानिकद़ृष्ट्या पाहता, मशरूममध्ये प्राणीजन्य प्रथिने (animal protein) नसतात.
मशरूम हे केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. ते कमी कॅलोरीजमध्ये भरपूर पोषणमूल्य देतात. मशरूममध्ये बीटा-ग्लुकान्स (Beta- glucans) नावाचे घटक असतात, जे प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि संसर्गांपासून शरीराचं संरक्षण करतात. मशरूममध्ये कोलेस्टेरॉल नसतो आणि फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाचं आरोग्य सुधारतात. मशरूममध्ये कॅलोरी आणि फॅट कमी असतात, पण फायबर भरपूर असते. त्यामुळे ते उपाशीपणाची भावना कमी करतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.