लंडन : डार्क चॉकलेट केवळ त्याच्या चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांमुळेही नेहमीच चर्चेत असते. आता एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे ‘थियोब्रोमाइन’ (Theobromine) हे नैसर्गिक तत्त्व शरीराचे जैविक वय (Biological Age) कमी करण्यास मदत करू शकते.
यूकेमधील ‘किंग्स कॉलेज लंडन’च्या शास्त्रज्ञांनी 1,600 हून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करून हे संशोधन केले आहे. ज्या लोकांच्या रक्तामध्ये थियोब्रोमाईनची पातळी जास्त आढळली, त्यांचे जैविक वय त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा कमी असल्याचे दिसून आले. रक्तातील थियोब्रोमाईनचा स्तर आणि शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा थेट संबंध असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. आपले वय आपण सहसा वर्षांमध्ये मोजतो; पण ‘बायोलॉजिकल एज’ हे त्यापेक्षा वेगळे असते. आपले शरीर आतून किती निरोगी आहे आणि आपले अवयव किती कार्यक्षमतेने काम करत आहेत, यावरून हे वय ठरते.
डीएनए मधील रासायनिक बदलांच्या आधारे शास्त्रज्ञ हे वय मोजतात. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे जैविक वय हे त्याच्या प्रत्यक्ष वयापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. थियोब्रोमाईन हे कोकोमध्ये आढळणारे एक नैसर्गिक अल्कलॉईड आहे. 100 ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये साधारणपणे 200 ते 450 मिलीग्राम थियोब्रोमाईन असते. हे तत्त्व शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते.
शास्त्रज्ञांच्या मते, थियोब्रोमाईन ‘टेलोमेअर’ला लवकर लहान होण्यापासून रोखते. टेलोमेअर हे क्रोमोझोमच्या टोकावर असतात, जे वय वाढेल तसे लहान होत जातात. ते जेवढे लांब असतील, तितके शरीर तरुण मानले जाते. संशोधनाचे निकाल सकारात्मक असले, तरी याचा अर्थ असा नाही की, भरपूर डार्क चॉकलेट खावे.
तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे : 1. मर्यादित सेवन : डार्क चॉकलेटला ‘आरोग्यदायी अन्न’ न मानता एक ‘ट्रीट’ (औषध किंवा आनंदासाठी खाण्याचा पदार्थ) म्हणूनच पाहावे. 2. साखर आणि फॅट : यात असलेले अतिरिक्त साखर आणि फॅट आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. 3. समतोल आवश्यक : केवळ डार्क चॉकलेट खाऊन वय कमी होणार नाही; त्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाचीही गरज आहे.