बर्लिन : कृत्रिम हात किंवा पाय यांचा वापर प्राचीन काळापासूनच होत आलेला आहे. आपल्याकडे ऋग्वेदात युद्ध वीरांगना असलेली राणी विश्पला हिला अश्विनीकुमारांनी लोखंडाचा कृत्रिम पाय बनवून दिल्याचे वर्णन आढळते. जगभरात अनेक ठिकाणी जुन्या काळापासून अशा कृत्रिम साधनांचा वापर होत आला आहे. आता संशोधकांनी मध्ययुगीन काळातील एक लोखंडी कृत्रिम हात सापडला आहे. हा एका प्राचीन सांगाड्याला जोडलेला होता. हा सांगाडा 15 व्या शतकातील असल्याचं म्हटलं जातं. जर्मनीतील फ्रीझिंग येथे हा कृत्रिम हात सापडला आहे, जो त्या काळातील कृत्रिम अवयवाच्या तंत्रज्ञानाचा आणि वैद्यकीय शोधाचा पुरावा असल्याचे सांगितले जात आहे. हा एक अनोखा पुरातत्त्व शोध असल्याचे बोलले जात आहे, जे पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत.
द सनच्या वृत्तानुसार, बव्हेरियन राज्य कार्यालयाने शुक्रवारी एक प्रेस रिलीज जारी करून या शोधाची घोषणा केली. सेंट जॉर्ज चर्चजवळ उत्खननादरम्यान हा कृत्रिम हात सापडला. बव्हेरियन स्टेट ऑफिसचे डॉ. वॉल्टर एरिंगलर यांनी लोकांना सापडलेल्या कृत्रिम हाताची माहिती दिली. डॉ. एरिंगलर म्हणाले की, हा कृत्रिम हात मध्ययुगीन काळातील वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या कल्पकतेचे चतुर आणि खरं उदाहरण आहे. ते म्हणाले, 'डाव्या हाताच्या पोकळ कृत्रिम अंगाला चार बोटे जोडण्यात आली होती, ज्यामध्ये तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी या मेटल शीटस्पासून बनवल्या होत्या. ही कृत्रिम बोटे एकमेकांना समांतर आणि किंचित वक्र होती. हा कृत्रिम हात पट्ट्यांच्या साहाय्याने बांधण्यात आला होता. ज्या सांगाड्यामध्ये हा कृत्रिम हात सापडला होता त्याचं मृत्यूवेळी वय किती होतं हे कार्बन डेटिंगद्वारे काढण्यात आलं. ज्यावरून असे दिसून आले की तो माणूस मरण पावला तेव्हा तो 30 ते 50 वर्षांच्या दरम्यान होता. त्यांनी असंही सांगितलं की तो माणूस 1450 ते 1620 दरम्यानचा असेल.
त्या काळात प्रोस्थेटिक्सच्या विकासात वाढ झाली होती. कारण, अनेक सैनिक जखमी व्हायचे आणि शरीराचे अवयव गमावायचे. हे क्षेत्र तीस वर्षांच्या युद्धाचा भाग राहिलेले आहे. यादरम्यान येथे अनेकजण जखमी झाले, अनेकांनी आपल्या शरीराचे अंग गमावले. या हाताला बनवण्यासाठी अत्यंत किचकट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ही गोष्ट याला आणखी खास बनवते. या काळातील कृत्रिम अवयव सापडणे हे काही दुर्मीळ नाही. आतापर्यंत अशी 50 ज्ञात कृत्रिम उपकरणं सापडली आहेत, जी मध्ययुगीन काळापासूनची आणि मध्य युरोपमध्ये आधुनिक काळातली आहेत.