विश्वसंचार

‘नासा’च्या मोहिमेत आंतरराष्ट्रीय अंतराळवीरही जाणार चंद्रावर

Arun Patil

वॉशिंग्टन : चांद्रभूमीवर मानवाचे पहिले पाऊल पडले अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेच्या 'अपोलो11' मोहीम. त्यानंतर अनेक 'अपोलो' मोहिमांमध्ये अनेक अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. मात्र गेल्या 50 वर्षांमध्ये एकाही मानवाचे पाऊल चंद्रावर पडलेले नाही. आता 'नासा'ने त्यासाठी 'आर्टेमिस' या मोहिमेची तयारी केली आहे. या मोहिमेत केवळ अमेरिकनच नव्हे तर एक आंतरराष्ट्रीय अंतराळवीरही चांद्रभूमीवर जाईल, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.

उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली. अमेरिकेबरोबर अन्यही अनेक देश या मोहिमेत सहभागी असून त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. हॅरिस यांनी व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय अंतराळ परिषदेच्या बैठकीत सांगितले की आर्टेमिस मोहिमेत आमच्या सहयोगी व भागीदारांनी एक शानदार भूमिका बजावली आहे.

त्यांच्या अशा आवश्यक भूमिकेला समजून घेऊन मला ही घोषणा करण्यात आनंद होत आहे की अमेरिकन अंतराळवीरांबरोबरच आम्ही दशकाच्या अखेरीस चंद्रावर एका आंतरराष्ट्रीय अंतराळवीरालाही घेऊन जाऊ. या परिषदेत हॅरिस यांच्यासह परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवनही उपस्थित होते. आर्टेमिस मिशन एकच होणार नसून अनेक होणार आहेत. प्रत्येक मिशनमध्ये चार अंतराळवीर असतील व त्यापैकी दोघेजण चांद्रभूमीवर उतरतील. अन्य दोघे ओरियन अंतराळ यान किंवा 'गेटवे' नावाच्या छोट्या अंतराळ स्टेशनमधून चंद्राभोवती फिरतील.

SCROLL FOR NEXT