वॉशिंग्टन : जेव्हा पृथ्वीवर अवाढव्य डायनासोरचा वावर होता, तेव्हा त्यांच्याच सावलीत छोटे सस्तन प्राणी बिळांमध्ये लपून राहत असत. याच काळात एका नवीन सरपटणार्या प्राण्याने म्हणजे सापाने आपल्यासाठी निसर्गात एक नवी जागा शोधून काढली. बारीक शरीराचे हे साप सस्तन प्राण्यांच्या बिळांमध्ये सहज शिरून त्यांची शिकार करू लागले.
नॉर्दर्न अॅरिझोना युनिव्हर्सिटीचे उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ मार्क टॉलिस यांच्या मते, सापांच्या सुरुवातीच्या काळाची ही एक शक्यता असू शकते. मात्र, सापांच्या जीवाश्मांचा इतिहास त्यांच्या शरीरासारखाच ‘लांब आणि विरळ’ आहे. त्यामुळे सापांची नेमकी सुरुवात कोठून झाली आणि त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक कोण आहेत, हे प्रश्न अजूनही संशोधकांसाठी कोडेच आहेत. सुमारे 12.5 कोटी वर्षांपूर्वी सापांनी आपल्या लवचिक शरीराच्या जोरावर वेगाने उत्क्रांती करण्यास सुरुवात केली. आज सापांनी अंटार्क्टिका वगळता सहा खंड आणि हिंदी व पॅसिफिक महासागर काबीज केले आहेत. (टॉलिस यांच्या मते, अंटार्क्टिका एकेकाळी उबदार असताना तिथेही सापांचे जीवाश्म सापडले, तर आश्चर्य वाटणार नाही.) निसर्गात नूडल्ससारखे बारीक आणि काही इंचांचे ‘थ—ेडस्नेक’ ते 20 फुटांहून अधिक लांब अजगरापर्यंत अनेक प्रकारचे विषारी-बिनविषारी साप आढळतात. काही साप पाठलाग करून शिकार करतात, तर काही दबा धरून बसतात. काही भक्ष्याचा गळा आवळून त्याला मारतात, तर काही विषाचा वापर करून शिकार अचेतन करतात. अंडी घालणारे साप, पिलांना थेट जन्म देणारे साप आणि नर जोडीदाराशिवाय प्रजनन करू शकणार्या मादी सापांच्या प्रजातीही अस्तित्वात आहेत.
खरे तर साप म्हणजे सरड्यांच्या कुटुंबातील एक वेगळी फांदी आहे. टॉलिस यांच्या मते, ‘साप म्हणजे शिकारी नळ्या आहेत. त्यांना पाय नाहीत किंवा ते अन्न चावून खाऊ शकत नाहीत. या मर्यादा असूनही, साप हे पृथ्वीवरील सर्वात यशस्वी प्राण्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे अशा काही ‘सुपरपावर्स’ आहेत ज्यांची आपण केवळ कल्पनेतच अपेक्षा करू शकतो.’ जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ अलेक्स पायरॉन यांच्या मते, सध्या सापांच्या 4,000 हून अधिक प्रजाती ज्ञात आहेत आणि शेकडो प्रजातींचा शोध लागणे अजून बाकी आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, सापांचे पूर्वज सुमारे 16 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. मात्र, जगातील पहिला साप जमिनीवर राहणारा होता, समुद्रात पोहणारा होता की जमिनीखाली बिळात राहणारा, याचे रहस्य अद्याप गुलदस्त्यातच आहे.