81 वर्षांच्या सुपरमॉमच्या जिद्द आणि चिकाटीची कथा  
विश्वसंचार

inspiring woman : हात-पाय नसतानाही एकटीने सांभाळली तीन मुले

81 वर्षांच्या सुपरमॉमच्या जिद्द आणि चिकाटीची कथा

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : आयुष्यात संकटं प्रत्येकासमोर येतात; पण त्या संकटांना आपली ताकद बनवणारे लोक विरळच असतात. चीनमधील 81 वर्षांच्या वांग युशी यांची कहाणी सध्या जगभरातील लोकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. जन्मतः हात आणि पाय नसतानाही त्यांनी ज्या जिद्दीने आपल्या तीन मुलांचे संगोपन केले, ती कथा कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही.

वांग युशी यांचा जन्म चीनच्या गांसू प्रांतातील बाययिन शहरात झाला. त्यांना जन्मापासूनच हात आणि पाय नव्हते. गरिबी आणि शारीरिक अपंगत्वामुळे त्यांचे सुरुवातीचे आयुष्य अतिशय कठीण गेले. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्या आयुष्याची पहिली 20 वर्षे त्यांना कोणतेही अधिकृत नावही नव्हते. वयाच्या 27 व्या वर्षी एका नोंदणी अधिकाऱ्याने त्यांना वांग युशी हे नाव दिले. वांग युशी यांचे लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगी आणि दोन मुलगे झाले. त्यांचे पती कामासाठी घराबाहेर असायचे, अशा वेळी संपूर्ण घराची आणि तीन लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या एका स्टूलवर बसून आपल्या शरीराच्या सहाय्याने पीठ मळत आणि भाज्या कापत असत. कपडे शिवण्यासाठी त्या तोंडाचा वापर करत, तर जेवताना कोपराच्या साहाय्याने चॉपस्टिक्स पकडत असत.

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी त्यांनी आपल्या मुलांना कधीही उपाशी झोपू दिले नाही. मुले मोठी होईपर्यंत त्यांनी प्रत्येक काम स्वतःच्या पद्धतीने आणि कष्टाने पूर्ण केले. वांग युशी यांचे पती 10 वर्षांपूर्वी वारले. आता त्यांची तिन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी असून त्यांचा स्वतंत्र संसार आहे. सध्या त्या आपल्या धाकट्या मुलासोबत राहतात. वयानुसार त्यांना रक्तदाबाचा त्रास असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. वांग युशी यांची कथा ही केवळ एका अपंग महिलेची कथा नाही, तर ती एका आईच्या अथांग प्रेमाची आणि अदम्य इच्छाशक्तीची साक्ष आहे. ‌‘हिंमत असेल तर कोणतीही शारीरिक उणीव तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही,‌’ हेच त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. आज संपूर्ण जग या सुपरमॉमच्या धैर्याला सलाम करत आहे. प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता कष्टाने संसार उभा करणाऱ्या वांग युशी खऱ्याअर्थाने रणरागिणी ठरल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT