लंडन; वृत्तसंस्था : हवामान बदल आणि जंगलांच्या ऱ्हासामुळे लहान कीटक आता मानवी जीवनासाठी मोठा धोका बनत आहेत. कीटकांचा वाढता विस्तार, नवनवीन आजार पसरवण्याची त्यांची क्षमता आणि माणसांच्या वस्त्यांमध्ये त्यांचा वाढता वावर यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
माशा, डास आणि टिक (उवा/गोचिड सदृश कीटक) यांसारख्या जीवांचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. घरगुती माशा केवळ अन्न दूषित करत नाहीत, तर साल्मोनेलासारखे घातक बॅक्टेरिया आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवतात. दुसरीकडे, डासांमुळे होणारा डेंग्यू आणि वेस्ट नाईल व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. काही कीटक तर स्वतःचे क्लोनिंग (प्रतिकृती) करून हजारो पटीने वाढू शकतात. काही कीटकांच्या लाळेमुळे माणसांना मांसाहारी अन्न किंवा दुग्धजन्य पदार्थांची गंभीर अॅलर्जी जडत असल्याचे समोर आले आहे.