लंडन : गेल्या तीन दशकांपासून जगभरातून कीटक अत्यंत चिंताजनक वेगाने गायब होत आहेत. काही अंदाजांनुसार, दरवर्षी कीटकांच्या संख्येत तब्बल 1 टक्क्यांपर्यंत घट होत आहे. कीटकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे की, काही शास्त्रज्ञांनी या परिस्थितीला ‘इन्सेक्ट अपोकॅलिप्स’ (Insect Apocalypse - कीटकांचा महाविनाश) असे नाव दिले आहे. याचा थेट परिणाम जागतिक अन्न सुरक्षेवर होऊ लागला आहे.
अनेक प्रकारचे कीटक हे पिकांच्या परागीकरणासाठी म्हणजेच फळ-फूल धारणा होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे कीटकांची संख्या घटल्याने केवळ परिसंस्थेचे (इकोसिस्टीम) आरोग्यच बिघडले नाही, तर पिकांच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. भूतकाळात शास्त्रज्ञांना या परिणामांचे थेट मोजमाप करणे कठीण जात होते. मात्र, 6 मे रोजी ‘नेचर’ या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन शोधनिबंधात, परागीकरण करणार्या कीटकांच्या कमतरतेचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, याचे पहिल्यांदाच अचूक मोजमाप करण्यात आले आहे.
संशोधकांनी नेपाळमधील 10 शेतकरी गावांमध्ये वर्षभर अभ्यास केला. या गावांमध्ये राहणारे लोक प्रामुख्याने स्वतः पिकवलेले अन्नच खातात. संशोधकांच्या पथकाने दर दोन आठवड्यांनी या गावांमध्ये सर्वेक्षण केले. यात कोणते कीटक आणि किती संख्येने पिकांना भेट देत आहेत, याची नोंद घेण्यात आली आणि त्यानंतर या माहितीची तुलना तिथल्या लोकांच्या कुपोषणाच्या प्रमाणाशी करण्यात आली. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत : गावकर्यांच्या शेतीच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 44 टक्के उत्पन्न हे परागीकरण करणार्या कीटकांमुळे येणार्या पिकांवर अवलंबून होते.
पोषणमूल्यांमध्ये घट : गावकर्यांच्या शरीराला मिळणार्या जीवनसत्व ‘अ’, जीवनसत्व ‘इ’ आणि फोलेट यांसारख्या आवश्यक पोषक घटकांपैकी 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा कीटकांद्वारे परागीकरण झालेल्या पिकांमधून मिळत होता. पिकांवर येणार्या कीटकांची संख्या आणि त्यांच्या प्रजातींमधील विविधता जशी कमी झाली, तशी लोकांच्या उत्पन्नात घट झाली आणि त्यांच्या आरोग्यावर कुपोषणाचा वाईट परिणाम झाला. या अभ्यासगटाच्या सह-लेखिका आणि ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधक नाओमी सॅव्हिल यांनी सांगितले की, आमच्या अभ्यासात सहभागी झालेल्या मुलांपैकी निम्म्याहून अधिक मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने खूपच कमी होती. यामागील मुख्य कारण म्हणजे कीटकांद्वारे परागीकरण होणार्या भाज्या, शेंगा आणि फळांवर आधारित असलेल्या त्यांच्या आहारात झालेली घसरण हेच आहे.