Infrared Glasses | इन्फ्रारेड चष्म्यांमुळे माणसाला अदृश्य प्रकाश पाहणे आता होणार शक्य! 
विश्वसंचार

Infrared Glasses | इन्फ्रारेड चष्म्यांमुळे माणसाला अदृश्य प्रकाश पाहणे आता होणार शक्य!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : मानवी डोळ्यांच्या निसर्गदत्त मर्यादा ओलांडून वातावरणातील अदृश्य ‘इन्फ्रारेड प्रकाश’ पाहणे आता शक्य होणार आहे. ‘बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान’च्या संशोधकांनी एका विशेष तंत्रज्ञानावर आधारित अतिशय हलका चष्मा तयार केला असून, याच्या मदतीने मानवाला इन्फ्रारेड तरंग प्रत्यक्ष रंगीत स्वरूपात दिसू शकणार आहेत. हे संशोधन ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नामांकित वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

हे तंत्रज्ञान कसे कार्य करते?

इन्फ्रारेड लहरींचे रुपांतरण : मानवी डोळ्यांतील पेशी इन्फ्रारेड प्रकाश ओळखू शकत नाहीत. हे ओळखण्यासाठी संशोधकांनी ‘मर्क्युरी टेल्युराइड कोलाइडल क्वांटम डॉटस्‌’चा वापर केला. हे सूक्ष्म कण इन्फ्रारेड प्रकाश शोषून त्याचे विजेच्या लहरींमध्ये रुपांतर करतात.

ओएलईडी लेअर : ही वीज चष्म्याच्या पारदर्शक लेन्सवर बसवलेल्या ‘ओएलईडी’ थरामध्ये पाठवली जाते. त्‍यामुळे इन्फ्रारेड प्रकाश मानवी डोळ्यांना दिसणाऱ्या रंगांमध्ये परावर्तित होतो.

रंगीत दृश्य (फुल कलर व्‍हिजन) : जुन्या नाईट-व्हिजन उपकरणांमध्ये इन्फ्रारेड प्रकाश फक्त एकाच रंगात (उदा. हिरवा किंवा राखाडी) दिसत असे. मात्र, हा नवीन चष्मा इन्फ्रारेडच्या तीव्रतेनुसार लाल आणि निळसर (सियान) छटांमध्ये दृश्य दाखवतो.

या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि उपयोग

दोन्ही दृश्ये एकाच वेळी : सामान्य नैसर्गिक प्रकाश आणि इन्फ्रारेड प्रकाश हे दोन्ही एकाच वेळी या चष्म्यातून स्पष्ट दिसतात. या प्रोटोटाईप चष्म्याचे वजन केवळ २३ ग्रॅम आहे. भविष्यात चष्म्याच्‍या उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे. अंधारात किंवा धुक्यात रस्ता शोधणे (नेव्‍हीगेशन), वैद्यकीय क्षेत्रातील कृत्रिम दृष्टी (व्हिज्युअल प्रोस्थेसिस) आणि ऑगमेंटेड रियॅलिटी (एआर) मध्ये याचा मोठा फायदा होईल. साप, वटवाघुळ आणि काही कीटक नैसर्गिकरित्या इन्फ्रारेड पाहू शकतात. या नवीन शोधामुळे मानवी दृष्टीलाही ‘सुपर व्हिजन’ मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे.

बायो-इलेक्ट्रॉनिक्स आणि नॅनो-तंत्रज्ञानाची जोडणी

संशोधकांनी विकसित केलेल्या या इन्फ्रारेड चष्म्याची कार्यपद्धती बायो-इलेक्ट्रॉनिक्स आणि नॅनो-तंत्रज्ञानाच्या जोडणीवर आधारित आहे. मानवी डोळा सामान्यतः ४०० ते ७०० नॅनोमीटर (एनएम) तरंगलांबीचाच प्रकाश पाहू शकतो. ७००एनएम पेक्षा जास्त तरंगलांबी असणाऱ्या इन्फ्रारेड लहरींच्या फोटॉन्समध्ये मानवी डोळ्यातील रेटिना पेशींना उत्तेजित करण्याची पुरेशी ऊर्जा नसते. हीच मर्यादा ओलांडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT