कैरो : इजिप्तमधील रहस्यमय पिरॅमिड, फिरओंच्या कबरी आणि नाईल नदीच्या काठावर वसलेली हजारो वर्षे जुनी संस्कृती... या वैभवाशाली साम्राज्याचा उदय कसा झाला असेल? हा प्रश्न आजही जगाला अचंबित करतो; पण या साम्राज्याच्या पायाभरणीमागे प्राचीन भारताची ताकद होती, असा दावा एका इतिहास संशोधकाने केल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सिंधू-सरस्वती खोर्यात विकसित झालेल्या संस्कृतीनेच इजिप्तमध्ये फरोओंच्या साम्राज्याची पायाभरणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा हा दावा सागरी इतिहासकार निक कॉलिन्स यांनी केला आहे.
निक कॉलिन्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपला हा सिद्धांत मांडला आहे, जो प्राचीन इतिहासाविषयीच्या अनेक प्रस्थापित मतांना आव्हान देणारा ठरला आहे. कॉलिन्स यांच्या मते, प्राचीन भारतातील सिंधू-सरस्वती संस्कृती ही एक प्रचंड मोठी आर्थिक शक्ती होती. या शक्तीने दूरवरच्या व्यापाराला चालना दिली आणि याच व्यापारामुळे सुरू झालेल्या एका साखळी प्रक्रियेने इजिप्तला प्राचीन जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक बनवले. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरातत्त्वीय पुरावा देताना कॉलिन्स यांनी म्हटले आहे की, 19 व्या शतकात पुरातत्त्वशास्त्रज्ञ फ्लिडंर्स पेट्री यांनी इजिप्तच्या ‘नकाडा’ प्रदेशात केलेल्या उत्खननात सापडलेल्या कलाकृतींवर बाहेरील संस्कृतींचा मोठा प्रभाव दिसतो.
यामध्ये सुमेरियन शैलीतील कबरी आहेत. मातीच्या विटांनी बनवलेल्या या कबरींची रचना सुमेरियन (मेसोपोटेमियन) संस्कृतीसारखी आहे. अफगाणिस्तानमधून आलेला ‘लापिस लाझुली’ नावाचा निळा मौल्यवान दगड, जो सुमेरियन संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर वापरला जात होता. नावेच्या आकाराची मातीची भांडी आणि सिंधू संस्कृतीच्या व्यापारात वापरले जाणारे दंडगोलाकार शिक्केदेखील या ठिकाणी सापडले होते. उत्खननात सापडलेल्या गोष्टींवरून हे स्पष्ट होते की, हा केवळ व्यापारी प्रभाव नव्हता, तर हे एका संस्कृतीच्या दुसर्या ठिकाणी झालेल्या ‘प्रत्यारोपणाचे’ संकेत आहेत, असे कॉलिन्स यांचे म्हणणे आहे.
कॉलिन्स यांच्या सिद्धांतानुसार, भारताच्या प्राचीन सिंधू-सरस्वती संस्कृतीतील लोकांची आणि सुमेरियन संस्कृतीतील लोकांची गरज, झालेले व्यवहार यातून देवाण-घेवाणीची प्रक्रिया झाल्याने संबंध द़ृढ झाले असावेत. सिंधू-सरस्वती संस्कृतीतील लोक सुमेरियन लोकांना अन्न, लाकूड आणि मसाल्यांसारख्या आवश्यक वस्तू पुरवत होते. या वस्तूंच्या बदल्यात सिंधू-सरस्वती संस्कृतीचे लोक सुमेरियन लोकांकडे मौल्यवान धातू, विशेषतः सोन्याची मागणी करत होते; पण सुमेरियन लोकांकडे सिंधू संस्कृतीला देण्यासाठी पुरेसे सोने नव्हते. त्यामुळे त्यांनी सोन्यासाठी इजिप्तवर आक्रमण केले किंवा प्रभाव टाकला असावा. इजिप्तमधून मिळवलेले सोने सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या लोकांना दिले जात असे. सोन्याच्या याच प्रचंड मागणीमुळे इजिप्तमध्ये एक संघटित आणि शक्तिशाली शासनव्यवस्था निर्माण झाली, ज्यातून पुढे फिरओंच्या महान साम्राज्याचा उदय झाला. याशिवाय, इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृतींमध्ये विश्वाची निर्मिती पाण्यापासून झाल्याच्या कथा आणि सप्तर्षींची संकल्पना आढळते. हे साधर्म्य आयात केलेल्या वैश्विक द़ृष्टिकोनाकडे निर्देश करते. निक कॉलिन्स यांचा हा सिद्धांत सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या आर्थिक सामर्थ्याला केंद्रस्थानी ठेवून इजिप्तच्या उदयाची एक नवी संकल्पना मांडणारा ठरला आहे.