इंदूर: इंदूरला ‘भिकारीमुक्त शहर’ बनवण्याच्या मोहिमेदरम्यान प्रशासनासमोर एक असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्याने अधिकारी आणि नागरिक दोघांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. शहरातील सराफ बाजारात चाकाच्या फळीवर बसून जाणारा दिव्यांग व्यक्ती, ज्याला लोक असहाय्य समजून मदत करायचे, तो प्रत्यक्षात कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक निघाला आहे. ‘मांगीलाल’ नावाच्या या व्यक्तीकडे इंदूरच्या विविध भागांत केवळ तीन घरेच नाहीत, तर त्याच्याकडे एक ‘स्विफ्ट डिझायर’ ही आलिशान कार आणि तीन रिक्षादेखील आहेत. विशेष म्हणजे, आपली कार चालवण्यासाठी त्याने एक खासगी ड्रायव्हरही ठेवला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या पुनर्वसन पथकाने जेव्हा मांगीलालला ताब्यात घेतले आणि त्याला पुनर्वसन केंद्रात नेण्याची तयारी दर्शवली, तेव्हा तो घाबरला. कारवाईच्या भीतीने त्याने स्वतःच्या संपत्तीचा पाढा वाचायला सुरुवात केली. मांगीलालने नोडल अधिकार्यांसमोर कबूल केले की : त्याचा भगतसिंग नगरमध्ये एक तीन मजली बंगला आहे. शिव नगरमध्ये 600 स्क्वेअर फूटचे घर आणि अलवासा भागात एक फ्लॅट आहे. त्याच्या तीन रिक्षा शहरात भाड्याने चालतात, ज्यातून त्याला नियमित उत्पन्न मिळते. दिव्यांगत्वाचा फायदा घेऊन त्याने ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गतही एक घर लाटले आहे.
मांगीलाल कधीही लोकांकडे उघडपणे पैसे मागत नसे. तो आपल्या हातांत बूट घालून आणि पाठीवर बॅग लटकवून जमिनीवर चाकाच्या फळीवरून जात असे. त्याची ही दयनीय अवस्था पाहून येणारे-जाणारे लोक स्वतःहून त्याला पैसे द्यायचे. यातून तो दिवसाला सरासरी 500 ते 1,000 रुपये कमवत असे. तपासामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांगीलाल केवळ भीक मागण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो एका सराईत सावकाराप्रमाणे काम करायचा. भीक मागून जमा झालेली मोठी रक्कम तो सराफ बाजारातील छोट्या व्यापार्यांना आणि दुकानदारांना जादा दराने व्याजाने द्यायचा.
दर आठवड्याला तो या दुकानदारांकडून व्याजाची वसुली करण्यासाठी जात असे. नोडल अधिकारी दिनेश मिश्रा आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी सांगितले की, मांगीलालच्या मालमत्तेची आणि बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू आहे. श्रीमंत असूनही सरकारी योजनांचा गैरफायदा घेणे आणि बेकायदेशीर सावकारी करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्याला जिल्हाधिकार्यांसमोर हजर केले जाणार असून, फसवणुकीच्या कलमांखाली त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.