जगातील सर्वात विचित्र परंपरा 
विश्वसंचार

‘ते‌’ मृत नातेवाईकांसोबत राहतात, जेवणही भरवतात!

जगातील सर्वात विचित्र परंपरा

पुढारी वृत्तसेवा

जकार्ता : घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की आपण अंत्यविधी करून त्यांना निरोप देतो. पण जगाच्या पाठीवर असा एक समुदाय आहे, जो मृत व्यक्तीला दफन करण्याऐवजी कित्येक महिने किंवा वर्षे घरातच ठेवतो. त्यांना जिवंत व्यक्तीप्रमाणे जेवण दिले जाते, त्यांचे कपडे बदलले जातात आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या जातात. इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावरील ‌‘तोराजा‌’ समुदायाची ही थक्क करणारी परंपरा आहे.

तोराजा समुदायासाठी मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट नसून परलोकाकडे जाणाऱ्या एका भव्य प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा कुटुंबातील एखाद्याचे निधन होते, तेव्हा त्याला लगेच ‌‘मृत‌’ मानले जात नाही. जोपर्यंत कुटुंब एका भव्य अंत्यसंस्कारासाठी पैसे जमा करत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला केवळ ‌‘मकूला‌’ म्हणजेच ‌‘आजारी व्यक्ती‌’ मानले जाते. मृतदेह सडू नये म्हणून त्यावर खास जडीबुटींचा लेप लावून तो जतन केला जातो. या समुदायातील अंत्यसंस्कार ही केवळ शोकसभा नसून ‌‘राम्बू सोलो‌’ नावाचा एक विशाल सामाजिक उत्सव असतो. हा उत्सव ३ ते १० दिवस चालतो, ज्यामध्ये संपूर्ण गाव आणि दूरचे नातेवाईक सहभागी होतात.

या सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रेड्यांचा बळी देणे. तोराजा लोकांच्या श्रद्धेनुसार, रेडा हे असे वाहन आहे जे मृताच्या आत्म्याला ‌‘पुया‌’ म्हणजेच परलोकापर्यंत घेऊन जाते. मृत व्यक्ती श्रीमंत असेल तर डझनावारी रेड्यांचा बळी दिला जातो. येथे मृतदेह जमिनीखाली गाडले जात नाहीत. त्याऐवजी चुनखडीच्या उंच कड्यांना कापून तिथे शवपेट्या ठेवल्या जातात. काही ठिकाणी नैसर्गिक गुंफांमध्येही या पेट्या सजवून ठेवल्या जातात. या खडकांच्या बाल्कनीमध्ये मृतासारखे दिसणारे लाकडी पुतळे ठेवले जातात, ज्यांना ‌’ताऊ-ताऊ‌’ म्हणतात. हे पुतळे कबरींचे रक्षण करतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबावर कायम ठेवतात, अशी या लोकांची धारणा आहे. ‌’राम्बू सोलो‌’ सोहळ्याचा खर्च अत्यंत प्रचंड असतो. हा खर्च पेलण्यासाठी कुटुंबाला नातेवाईक आणि समाजाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. मृताला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी समुदायातील लोक पैसे, रेडे आणि डुकरे दान करतात. विज्ञानाच्या युगात आजही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने पाळली जात असल्याने जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक या समुदायाकडे आकर्षित होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT