बाली : आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. आळस आला की आपण आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हवी तशी धडपड करू शकत नाही. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी संशोधकांनी जगभरातील आळशी लोकांवर एक संशोधन केले. त्यानुसार, जगातील सर्वात आळशी देशांमध्ये इंडोनेशिया आघाडीवर असल्याचे सुस्पष्ट झाले.
या संशोधनात संशोधकांनी 46 देशांमधील जवळपास 7 लाखांपेक्षा अधिक लोकांची चाचणी केली. यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनाचा अहवाल नेचर जनरलमध्ये प्रकाशित केला गेला आहे. भारत या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. वेगवेगळ्या देशातील नागरिक रोज किती चालतात, त्यांची शारीरिक हालचाल किती आहे, त्यांची जीवनशैली कशी आहे, यावरून हा अहवाल काढण्यात आला. यात इंडोनेशियाचे नागरिक फारसे चालत नाहीत, असे या अहवालातून निष्पन्न झाले. येथे रोज ते सरासरी केवळ 3513 पावले चालतात, असे आकडेवारी सांगते.
आळशी देशांच्या या क्रमवारीत सौदी अरेबिया दुसर्या क्रमांकावर आहे. येथील नागरिक दर दिवसाला 3807 पावले चालतात. तिसर्या क्रमांकावरील मलेशियन नागरिक केवळ 3963 पावलेच दिवसाला चालतात. येथे लोकांचे चालणेही फार कमी आहे. यानंतर फिलिपाईन्स 4008, दक्षिण आफ्रिकन्स 4105, इजिप्तवासी 4315, तर ब्राझीलवासी रोज 4289 पावले इतके कमी चालतात, असे आढळून आले. मेक्सिकोचे लोक दर दिवसाला सरासरी 4692 पावले चालतात. महासत्ता मानला जाणारा अमेरिकाही आळशी देशांपैकी एक आहे. तेथील नागरिक केवळ 4774 पावले दररोज चालतात. आपला आळस कमी करण्यासाठी दररोज 8000 ते 10,000 च्या आसपास पावले चालणे असावे, असे या अहवालात नमूद केले गेले आहे.