नवी दिल्ली : भारतातील महिला पुरुषांच्या तुलनेत झोपेशी संबंधित समस्यांचा अधिक सामना करत असल्याचे एका धक्कादायक अहवालातून समोर आले आहे. भारत आणि इतर 12 देशांमध्ये करण्यात आलेल्या ‘ग्लोबल स्लीप सर्व्हे 2026’नुसार, कौटुंबिक जबाबदार्या आणि मानसिक तणावाचा थेट परिणाम महिलांच्या झोपेच्या गुणवत्तेवर होत आहे.
सर्वेक्षणानुसार, जिथे 29 टक्के पुरुषांना झोप घेताना अडचणी येतात, तिथे महिलांमध्ये हे प्रमाण तब्बल 38 टक्के इतके आहे. झोपेत व्यत्यय आणणार्या प्रमुख कारणांमध्ये तणाव (39 टक्के), कामाची चिंता (37 टक्के) आणि घरातील जबाबदार्या (31 टक्के) यांचा समावेश आहे. भारतातील 44 टक्के लोक चांगल्या झोपेला आहार आणि व्यायामाइतकेच महत्त्वाचे मानतात. असे असूनही, केवळ 53 टक्के भारतीयच आठवड्यातून चार किंवा त्यापेक्षा कमी रात्री शांत झोप घेऊ शकतात.
धक्कादायक बाब म्हणजे, झोपेच्या कमतरतेबाबत डॉक्टरदेखील फारसे गंभीर नसल्याचे या सर्वेक्षणातून सूचित होत आहे. झोप पूर्ण न झाल्यामुळे 39 टक्के लोक दुसर्या दिवशी जास्त तणावग्रस्त असतात, तर 35 टक्के लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. 71 टक्के नोकरदार भारतीयांच्या मते, झोपेच्या अभावामुळे त्यांच्या एकाग्रतेवर आणि कामगिरीवर विपरीत परिणाम होतो. खराब झोपेमुळे उद्भवणार्या थकव्यामुळे सुमारे 77 टक्के लोकांना आजारपणाचे कारण सांगून सुट्टी घ्यावी लागते. चांगल्या आरोग्यासाठी झोप ही केवळ विश्रांती नसून ती शरीराची गरज आहे, हेच या अहवालावरून स्पष्ट होते.