लंडन : अनिवासी भारतीय संजू पाल या एंडोमेट्रिओसिस नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांची ही न्यायालयीन लढाई यूकेच्या इक्वॅलिटी अॅक्ट 2010 (समानता कायदा) अंतर्गत या आजाराशी संबंधित अपंगत्व भेदभाव आव्हानांपैकी पहिली मानली जात आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना मिळणारी वागणूक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ‘गळाकापू’ संस्कृतीला आव्हान देणारा एका महिला व्यावसायिकाचा सहा वर्षांचा संघर्ष आता लंडनच्या उच्च न्यायालयातील अपिल ट्रिब्युनलमध्ये पोहोचला आहे.
41 वर्षीय संजू पाल यांनी दावा केला आहे की, त्यांचा आजार (एंडोमेट्रिओसिस) हा कायद्यानुसार अपंगत्वाच्या श्रेणीत येतो आणि त्या आधारावर त्यांच्याशी झालेला भेदभाव बेकायदेशीर आहे. सल्लागार क्षेत्रात वापरल्या जाणार्या अप ऑर आऊट पद्धतीला त्यांनी आव्हान दिले आहे. या पद्धतीत, जर कर्मचारी पुढच्या पदावर बढतीसाठी तयार नसेल, तर त्याला कामावरून काढून टाकले जाते. संजू यांच्या मते, ही पद्धत यूकेच्या एम्प्लॉयमेंट राईटस् अॅक्ट 1996 नुसार अन्यायकारक आहे.
संजू पाल या अॅक्सेंचर (यूके) लिमिटेड या प्रसिद्ध सल्लागार कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. 2019 मध्ये त्यांना अपेक्षित कामगिरी न केल्याच्या कारणास्तव कामावरून काढण्यात आले होते. कारण, त्या सीनियर मॅनेजर पदासाठी तयार नसल्याचे कंपनीचे म्हणणे होते. 2022 मध्ये एका ट्रिब्युनलने त्यांचा अनफेअर डिस्मिसल (अन्यायकारक हकालपट्टी) चा दावा मान्य केला होता आणि त्यांना 4,275 पौंडस्ची नुकसानभरपाई दिली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा आजार अपंगत्व म्हणून मान्य करण्यात आला नव्हता. आता उच्च न्यायालयात याच मुद्द्यावर दाद मागण्यात आली आहे.
एंडोमेट्रिओसिस हा महिलांमधील एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये ओटीपोटात तीव्र वेदना होतात. यूकेमध्ये सुमारे 15 लाख महिला या आजाराने त्रस्त आहेत. संजू यांच्या मते, कामाच्या ठिकाणी या आजाराने ग्रस्त महिलांना मिळणार्या वागणुकीसाठी त्यांचा खटला एक वळण ठरू शकते.